मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण दीड कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. या नोटा दोन फळांच्या मध्ये लपवल्या होत्या. प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून करोडो रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. हे चलन दडवून आणण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या विदेशी नोटांची किंमत दीड कोटी एवढी आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून विदेशी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाने या नोटा दोन फळांच्या डब्यांच्या मध्येच लपवल्या होत्या. आरोपीला रविवारी अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खतीब रहीम असे आरोपीचे नाव असून तो कर्नाटकातील कारवारचा रहिवासी असून तो दुबईला जात होता.
याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, विमानतळावर प्रवाशांची प्रोफाइलिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे रहीमला थांबवले. त्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या फळांच्या डब्यात दुबई, सौदी अरेबिया, ओमान आणि अमेरिकेच्या 1.50 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या. साध्या दिसणाऱ्या व्यक्तीकडून एवढी मोठी रक्कम मिळाल्याने कस्टम अधिकारीही चक्रावून गेले.
नातेवाईकाने दिले होते हे पार्सल
त्याचवेळी, चौकशीदरम्यान रहीमने उघड केले की, दुबईला पोहोचण्यासाठी त्याच्या एका नातेवाईकाने हे पार्सल त्याला दिले होते. अधिकारी आता रहीमच्या नातेवाईकाची अधिक माहिती गोळा करत आहेत. अधिका-यांनी सीमाशुल्क कायदा आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या संबंधित कलमांतर्गत मोठ्या प्रमाणात विदेशी चलनी नोटांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.