Apollo Pipes : असे म्हणतात की, शेअर बाजार एक जुगार आहे. कधी कधी फार चांगले रिटर्न तुम्हाला मिळतात. तर कधी तुम्ही लावलेले पैसे देखील परत मिळत नाहीत. मात्र एका कंपनीच्या स्टॉकने चक्क कमालच केली आहे. अपोलो पाईप्सच्या स्टॉकने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना ब्लॉकबस्टर परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरच्या किमतीत 11 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013 मध्ये ज्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांनी जर गुंतवलेली रक्कम तशीच ठेवली असती तर आज घडीला गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींहून अधिक झाले असते. चला जाणून घेऊया या स्टॉकने कसा अप्रतिम परतावा दिला आहे.
Table of contents [Show]
2013 मध्ये ही होती शेअरची किंमत
2013 मध्ये या शेअरची किंमत 4.83 रुपये होती. म्हणजेच 5 रुपयांपेक्षा कमी. तेव्हापासून हा शेअर अनेक पटींनी वाढून 540 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, या पेनी स्टॉकने (penny stock) गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा (Return) दिला आहे. अपोलो पाईप्स या स्टॉकने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर 1.11 कोटी रुपयांमध्ये केले आहे.
अपोलो कंपनीचे कार्य
अपोलो पाईप्स ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे, ज्याचे बाजार भांडवल फक्त 2,148 कोटी रुपये आहे. ही कंपनी पाईप सिस्टीमचे उत्पादन आणि वितरण करते. कंपनी पाईप फिटिंग्ज, स्प्रिंकलर सिस्टम आणि सॉल्व्हेंट सिमेंट तयार करते.
शेअरहोल्डर पॅटर्न
जर आपण या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर त्यानुसार, प्रवर्तकांकडे 52.03 टक्के भागभांडवल आहे. त्याच वेळी, उर्वरित 47.33 टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे आहे. सार्वजनिक भागधारकांबद्दल बोलायचे झाले तर, म्युच्युअल फंडात 11.23 टक्के हिस्सा आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांचा दोन टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांचा सुमारे 26 टक्के हिस्सा आहे.
विक्रीही अनेक पटींनी वाढली
या कालावधीत अपोलो पाईप्सच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. 2012-13 या आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 68 लाख रुपये होती. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीची एकूण विक्री वाढून 784 कोटी रुपये झाली आहे. त्याच वेळी, निव्वळ नफा देखील या कालावधीत 36 लाख रुपयांवरून 50 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)