सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मोठमोठ्या उलथापालथी होत आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींच्या संपत्तीत कधी वाढ तर कधी घट बघायला मिळते आहे. अशातच भारतातील रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश धीरूभाई अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. एवढेच नाही तर ते आशियातील सर्वात मोठे उद्योगपती ठरले आहेत. ही माहिती दिली आहे ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने. ब्लूमबर्ग दर महिन्याला जगभरातील उद्योगपतींच्या संपत्तीची नोंद घेत एक यादी प्रकाशित करत असते. खरे तर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांची नेटवर्थ अचानक वाढली आहे.
मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे ते जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 98.3 अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे या आठवड्यात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 669 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे.
श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 255 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) असून त्यांची संपत्ती 203 अब्ज डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर 160 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेझोस (Jeff Bezos) हे आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.
जाणून घ्या जगातील टॉप-10 श्रीमंत कोण आहेत?
जगातील श्रीमंत व्यक्तींची नेट वर्थ (अब्ज डॉलर्समध्ये)
1. एलन मस्क (Elon Musk)- 255
2. बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault)- 203
3. जेफ बेझोस (Jeff Bezos) - 160
4. बिल गेट्स (Bill Gates)- 138
5. लॅरी एलिसन (Larry Ellison)- 134
6. स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer)- 123
7. वॉरेन बुफे (Warren Buffett)-115
8. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg- 115
9. लॅरी पेज (Larry Page)- 112
10. सर्जी ब्रिन (Sergey Brin)- 106
11. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 98.3
गौतम अदानी कुठे?
कधी काळी जगातील श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आणि आशियातील श्रीमंताच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी (Gautam Adani) हे जगभरातील श्रीमंताच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आहेत. तर भारताचा विचार केल्यास ते देशातील दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 60.8 अब्ज डॉलर इतकी आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर त्यांच्या संपत्तीत वर्षभरात 59.7 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.