मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला चार दिवसीय भारत दौऱ्यावर ( Microsoft CEO Satya Nadella India Visit) असून काल मुंबईमध्ये त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट फ्युचर रेडी लिडरशीप समिट' या परिषदेत भाग घेतला होता. या वेळी बोलताना नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.
यावेळी बोलताना नाडेला म्हणाले की, सुरक्षा, कोलॅबरेटिव्ह बिजनेस प्रोसेस, मनुष्यबळ, क्लाऊड सुविधेचा वापर, माहिती एकत्रीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या सहा महत्त्वाच्या गोष्टींवर मायक्रोसॉफ्ट जास्त लक्ष देत आहे. "ज्या पद्धतीने भारतामध्ये नागरिकांच्या सोईसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, हे आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय असं काम आहे. भारत आज डिजिटल क्षेत्रात नेतृत्त्व करत आहे, सर्वांसमोर एक उदाहरण उभं करत आहे" असं सत्या नाडेला भारताचं कौतुक करताना म्हणाले. भारताच्या या दौऱ्यातून मला खुप काही पाहायला मिळत आहे. फक्त मोठ्या शहरांमध्येच नाही तर गाव खेड्यांमध्येही डिजिटल सुविधांनी कमाल केली आहे, असे पुढं नाडेला म्हणाले.
सत्या नाडेला आज (बुधवारी) दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची देखील ते भेट घेणार आहेत. सोबतच आयटी, कम्युनिकेशन आणि रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत. भारतीय वंशाचे अल्फाबेट कंपनीचे प्रमुख सुंदर पिचाई यांचा भारत दौरा झाल्यानंतर दोनच आठवड्यांनी नाडेला भारतात आले आहेत.
कोण आहेत सत्या नाडेला?
सत्या नाडेला हे भारतीय वंशाचे असून तेलंगणामधील हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. सध्या त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. त्यांचे वडील 1962 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय अधिकारी होते, तर आई संस्कृतच्या शिक्षिका होत्या. कर्नाटकातील मनिपाल इस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकाला गेले होते. मायक्रोसॉफ्टमधील क्लाउड काम्युटिंग सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केल्यानंतर त्यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली.