दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मेटाने देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशातील तब्बल 10 लाख व्यापाऱ्यांना व्हॉट्सॲप बिझनेस ॲप (WhatsApp Business App) वापरण्यासाठी खुद्द मेटा प्रशिक्षण देणार आहे. सध्या डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे. छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वास्तुमालाची विक्री करताना मार्केटिंग करण्यासाठी अनेक अडचणी येतात. अपुऱ्या सोयीसुविधा, तंत्रज्ञानाची अपुरी माहिती यामुळे स्वतःची जाहिरात करणे त्यांच्यासाठी मोठे दिव्य असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता मेटाने स्वतः पुढाकार घेतला आहे. याचा फायदा खेड्या-पाड्यातील छोट्या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना होणार आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) सोबत मेटाने नुकताच याबाबतचा एक करार केला आहे. या कार्यक्रमाची घोषणा मागच्याच महिन्यात केली गेली होती. आता CAT आणि Meta दरम्यान औपचारिक करार करण्यात आला आहे. या अंतर्गत, येत्या 3 वर्षात देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांसोबत हे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत आणि त्यांना व्हॉट्सॲप बिझनेस ॲप वापरण्यासाठी शास्त्रशुध्द ट्रेनिंग दिले जाणार आहे. आपल्या परिसरात ते डिजिटल मार्केटिंग करून ग्राहकांशी संवाद साधू शकणार आहेत आणि अर्थात स्वतःची व्यवसायवृद्धी देखील करू शकणार आहेत.
WhatsApp Se Wyapaar: CAIT & META To Digitise 10 Million Traders In India https://t.co/80xIylf152… #WhatsAppSeWyapaar@WhatsApp @whatsappbiz @Meta @CAITIndia@minmsme @FollowCII @ficci_india @ASSOCHAM4India @PiyushGoyal @PMOIndia pic.twitter.com/iTOEPGKM6W
— NFAPost (@TheNFAPost) July 24, 2023
मेटा स्मॉल बिझनेस अकॅडमी
फेसबुकसह व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाने नवोदित उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग कौशल्ये शिकवण्यासाठी 'मेटा स्मॉल बिझनेस अकॅडमी' (Meta Small Business Academy) हा नवीन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
भारताची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या लक्षात घेता दुर्गम भागातही आता दळणवळणाची साधने पोहोचली आहेत. मोबाईल नेटवर्क देखील आता डोंगरदऱ्यात दाखल झाले आहे. या सर्वांचा उपयोग गावाखेड्यातील छोट्या व्यापाऱ्यांना व्हायला हवा या हेतूने मेटाने बिझनेस अकॅडमी स्थापन केली आहे. भारतात सध्या ‘डिजिटल क्रांती’ घडत असून, केंद्र सरकारने डिजिटलीकरणासाठी राबवलेली प्रक्रिया कौतुकास्पद आहे असे मत मेटाचे ग्लोबल अफेयर्स संबंधी विभागाचे प्रमुख निक क्लेग यांनी म्हटले आहे.
अभ्यासक्रम आणि परीक्षा
मेटा स्मॉल बिझनेस अकादमीचे प्रशिक्षण विशेषत: नवोदित उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणार आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम भारतभरातील लघु आणि मध्यम उद्योजकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी एक स्पेशल अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यापाऱ्यांची एक परीक्षा देखील घेतली जाणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तामिळ आणि तेलगू या 11 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
देशभरातील जवळपास सर्वच छोटे मोठे व्यापारी त्यांच्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करत असतात. त्यांचा हा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.