फेसबुकची पॅरेन्ट कंपनी मेटा ही प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि सोशल मिडियावरील इन्फ्ल्युन्सरना कोट्यवधी रुपये देत आहे. याचं कारण तुम्हाला कळलं तर तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. या सेलिब्रिटींच्या मदतीने कंपनी अॅनिमेटेड एआय चॅटबॉक्सचा वापर करून व्हर्च्युअल पात्रांची निर्मिती करत आहे आणि त्यासाठी कंपनी या सेलिब्रिटींना दिवसांतील 5 ते 6 तासांसाठी 5 मिलिअन डॉलर (अंदाजे 40 कोटी रुपये) देत आहे.
प्रसिद्ध व्यक्तींच्या कॅरक्टरचा वापर करून सोशल मिडियावर त्यांची व्हर्च्युअल पात्र तयार केली जात आहेत. या पात्रांमध्ये संबंधित व्यक्तींच्या आवडीनिवडी, गुणविशेषांचा अभ्यास करता यावा. यासाठी मेट या प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत आहे आणि त्यासाठी या व्यक्तींना कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. सुरुवातीला अशा पद्धतीने प्रसिद्ध व्यक्तींचा वापर करून फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामच्या कंपनीने 1 मिलिअन डॉलर रुपये देण्याचे ठरवले होते. पण कालांतराने या प्रोजेक्टमध्ये काही मोठ्या सेलिब्रिटींचे नावे देखील येऊ लागली. त्यामुळे कंपनीने या प्रोजेक्टचे बजेट वाढवले आहे. आता या कामासाठी सेलिब्रिटी आणि सोशल मिडिया इन्फ्ल्युर्सना 5 मिलिअन डॉलर दिले जात आहेत.
व्हर्च्युअल पात्रांमध्ये कोणत्या नावांचा समावेश
मेटाने सुरू केलेल्या या प्रोजेक्टमध्ये हळुहळू मोठमोठे सेलिब्रिटी सहभागी होऊ लागले आहेत. मेटा सध्या नॅशनल फुटबॉल लीगचा माजी खेळाडू टॉम ब्रॅडी, रॅपर स्नूप डॉग, सुपरमॉडेल केन्डल जेनर आणि टिकटॉकवरील इन्फ्ल्युर्स चार्ली डी अॅमेलिओ यांच्यासोबत काम करत आहे. मेटाने मागील दोन वर्षात या कामासाठी काही सेलिब्रिटींना जवळपास 40 कोटी रुपये दिले आहेत.
मेटा कंपनीचा सीईओ मार्क झुकेरबर्ग (Meta CEO Mark Zukerberg) याने सप्टेंबरमध्ये चॅटजीपीटीप्रमाणेच आपल्या प्लॅटफॉर्मवर एआय व्हर्च्युअल कॅरेक्टर आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या काही दिवसात मेटा कंपनीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर 8 नवीन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील व्हर्च्युअल पर्सनॅलिटी पाहायला मिळतील. हे चॅटबॉट ग्राहकांशी कोणत्याही विषयांवर तासन् तास गप्पा मारू शकणार आहेत.