• 27 Mar, 2023 07:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Masala Queen: सफाई कर्मचाऱ्यांनी उभी केली करोडोंची मसाला कंपनी, कमल परदेशींचा प्रेरणादायी प्रवास!

Masala Queen

Kamal Pardeshi: रस्त्याची झाडलोट करणं, पाईपलाईनसाठी खड्डे खोदण, विहीरी खोदण अशी सगळी कामं करून कमल परदेशी यांनी बचत गट सुरू केला. 300 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज 500 कोटींचा उलाढाल करतो आहे. उत्तम नियोजन आणि चिकाटी अंगी असली की काय घडू शकत हे 'अंबिका बचत गटाच्या' (Ambika Masale) कामकाजावरून लक्षात येतं.

कमल परदेशी हे नाव अजूनही अनेकांना परिचित नाही. एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून त्यांची खास ओळख असली तरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणे त्या पसंत करतात. डोक्यावर पदर घेतलेली, कपाळावर मोठ्ठं कुंकू लावलेली, नववारी साडीतली ही महिला 500 कोटींचा मसाल्याचा व्यवसाय सांभाळते यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. याच कमलाताईंचा व्यावसायिक प्रवास आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

कमलताईंचं कुटुंब शेतमजुरी करायचं. 3 भावांच्या पाठीवर कमल यांचा जन्म झाला होता.घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांचे लाड पुरवले जात. मुलीला शिक्षणाची गरज काय? असा त्यावेळी समज होता, त्यामुळे कमलताईंना शाळेत दाखल केलं नव्हतं. वयाच्या 18 व्या वर्षी एक शेतमजूर मुलगा बघून घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर नवऱ्यासोबत त्या कामाच्या शोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरल्या.रस्त्याची झाडलोट करणं, पाईपलाईनसाठी खड्डे खोदण, विहीरी खोदण अशी सगळी कामं त्यांनी केली. बिऱ्हाड उचलायचं आणि काम मिळेल त्या गावी जायचं असा त्यांचा संसार सुरू होता. अनेकदा आम्ही स्मशानभूमीत देखील मुक्काम केलाय असं कमलताई सांगतात. कमलाताईंना 3 मुली झाल्या, मुली मोठ्या होऊ लागल्यावर कुठेतरी आपण स्थायिक झालं पाहिजे असं त्यांना वाटलं. पुण्याजवळील दौड तालुक्यातील खुडगाव येथे त्यांनी स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. हे झालं होतं 1999-2000.

2000 साली महाराष्ट्रात बचत गटाची चर्चा होऊ लागली होती. गावोगावी महिलांना बचतीबद्दल सजग केलं जात होतं. खुडगावात स्थायिक झालेल्या कमलताई आता शेतमजूर म्हणून कामाला जाऊ लागल्या होत्या. कामावर जेवणाच्या सुट्टीत सगळ्या महिला एकत्र जेवण करत. जेवताना एकदा बचत गटाचा विषय निघाला. 'बचत गट' ही नेमकी काय भानगड आहे हे सगळ्याच महिलांना जाणून घ्यायचं होतं. परंतु जवळजवळ सगळ्याच महिला निरक्षर होत्या त्यामुळे नेमकी माहिती त्यांना मिळत नव्हती.

ambika-masale-1.jpg

कमलताईंनी घेतला पुढाकार!

सगळ्या महिलांनी कमलताईंना विनंती केली की, जवळच्या बँकेत जाऊन बचत गटाची माहिती घेऊन या. बँकेत गेले तर दिवसाचा रोजगार बुडेल असं कमलताईंना वाटलं. आम्ही तुम्हांला कामात मदत करू असं म्हणत इतर महिलांनी त्यांना बँकेत धाडलं.

बँकेच्या दारातच उभं राहून कमलाताई मॅनेजरशी बोलू लागल्या. आपल्याला बँकेतले कर्मचारी प्रवेश देतील की नाही हा न्यूनगंड त्यांना होता. मॅनेजरने कमलताईंना आत बोलावलं आणि आत्मविश्वास दिला. "आमच्याकडे स्वतःच घर नाही, शिक्षण नाही, बँक कसं काम करते ते माहित नाही, आम्हांला बचत गट सुरू करता येईल का?" कमलताईंनी बँक मॅनेजरला थेट सवाल केला.

बचत गट कुणीही सुरू करू शकतं असं मॅनेजरने त्यांना सांगितलं. बचत गट सुरू करण्यासाठी फक्त रेशनकार्ड लागतं अशी माहिती त्यांना दिली गेली. सोबतच महिन्याला शक्य होतील तेवढे पैसे तुम्ही बँकेत टाकू शकतात असंही सांगितलं. बँकेतून मिळवलेली माहिती शेतात येऊन कमलताईंनी इतर महिलांनी दिली. "आपापल्या नवऱ्यांना न सांगता हे काम करायचं" असं सगळ्यांनी ठरवलं. 8 रुपये रोजंदारीवर काम करणारे आपण बचत करायला लागलो तर घरचे लोक हजार प्रश्न विचारतील अशी धास्ती या सर्व महिलांनी होती.

पैसा बचतीसाठी ओव्हरटाईम करण्याचा निर्णय!

पैशाची बचत करायची असेल तर अधिक पैसे कमवावे लागतील हे व्यवहारज्ञान सर्व महिलांकडे होतं. 13 महिलांनी एकत्र येत बचत गट सुरू केला. गटाचं बँकेत खातं खोललं गेलं. 'अंबिका महिला बचत गट' असं नाव बचतगटाला दिलं गेलं. सकाळी 2 तास आधी आणि संध्याकाळी 1 तास उशिरा आपण काम करू असं महिलांनी ठरवलं. 8 रुपये रोज मिळणाऱ्या महिला आता 10-12 रुपये रोज मिळवू लागल्या होत्या. अधिकचे पैसे महिला बँकेत जाऊन भरू लागल्या. वर्षभर बचत करून महिलांनी 4500 रुपये जमवले होते.

बचतीच्या पैशाचं करायचं काय?

बँकेत आता 4500 रुपये जमा झाले होते. महिलांसाठी ही फार मोठी रक्कम होती. महिलांनी या पैशातून व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. परंतु शेतमजूर, कामगार वर्गातून येणाऱ्या या सर्व महिलांना व्यापार कसा करतात, कसा चालवतात याचं ज्ञान नव्हतं. एकीने सुचवलं की आपण मसाला तयार करू आणि आठवडी बाजारात विकू. बाकी महिलांनी या सूचनेला अनुमोदन दिलं. कारण, सगळ्याच महिला आपापल्या घरी वर्षातून एकदा मसाला बनवतच होत्या. त्यासाठी वेगळं काही शिकायची गरज त्यांना नव्हती.

सुरू झाला 'अंबिका मसाले'चा अध्याय

बचतीच्या पैशातून 300 रुपये काढून महिलांनी मसाला बनवण्याची योजना आखली. मिर्ची, धने, लवंग आदी कच्चा माल खरेदी केला. परंतु हे मसाले बनवायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. अनेकांच्या घरच्यांना महिलांच्या या 'उद्योगाची' कल्पना नव्हती. रात्रीची जेवणं आटोपली, मुलं झोपी गेली की महिला कुणाच्या तरी घरी एकत्र जमत आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून उखळ आणून मसाला बनवत. रात्रीची ही सगळी कामं उरकून परत सकाळी शेतावर महिला हजर राहायच्या.

ambika-masale-2.jpg

संघर्षाला सुरुवात…

बनवलेला मसाला गावातच विकून बघुयात असं महिलांना ठरवलं. गावातल्या मंडळींना मसाल्याची चव आवडली नाही. तुमच्या मसाल्याचा वास येत नाही असं म्हणत त्यांनी खरेदीसाठी मनाई केली. परंतु महिलांचा उत्साह कमी झाला नाही. तालुक्याला जाऊन आठवडी बाजारात महिला मसाला विकू लागल्या.

2004-2005 मध्ये भीमथडीच्या जत्रेत महिलांनी त्यांचा स्टॉल लावला.5 किलो अंबिका मसाला हातोहात विकला गेला. महिलांचा आत्मविश्वास आता वाढू लागला होता. पुढे बांद्राच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात देखील बचत गट सामील झाला. परंतु मुंबईत येताना मसाला ओला झाला. गुळासारखा दिसणारा मसाला घ्यायला कुणीही तयार नव्हतं. सगळ्या मसाल्याच्या पुड्या फोडून महिलांनी त्याचे गोळे बनवले आणि 5 रुपयाला एक मसाल्याचा गोळा विकला.

महिलांचं हे काम आता त्यांच्या घरच्यांना माहिती होऊ लागलं. महिलांच्या या कामाला त्यांच्या कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिलं.

भांडवल कमी आणि मागणी जास्त

महिलांचं काम आणि जिद्द बघून लोक आता मदत करायला लागले होते. मसाल्याची मागणी आता वाढू लागली होती. भांडवल कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती होती. त्यातच 2006 साली मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला झालेल्या एका कार्यक्रमात बिग बझारने अंबिका मसाल्याची ऑर्डर दिली. मुंबईतल्या 19 मॉलमध्ये अंबिका मसाला विक्रीसाठी ठेवला जाणार होता. तब्बल 2 लाख 60 हजारांची ऑर्डर अंबिका मसाल्याला मिळाली होती. 300 रुपयातून सुरू झालेला व्यवसाय लाखोंच्या घरात पोहोचला होता.

kamal-pardeshi.jpg
कमलताईंच्या कामाचा विविध संस्थांनी आजवर गौरव केला आहे.

वेगवेगळे प्रयोग सुरू…जर्मनीत पोहोचला अंबिका मसाला

आता महिलांना मार्केटिंग काय असतं हे कळू लागलं होतं. पॅकेजिंग किती महत्वाचं आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. प्लास्टिकच्या पिशवीत मसाला विकण्यापेक्षा बॉक्समध्ये मसाला विकायचा बचत गटाने निर्णय घेतला. अन्न-औषध परवाना, धूर प्रदूषण दाखला अशी सगळी आवश्यक ती कागदपत्रे बचत गटाने काढली.

अंबिका बचत गटाला पुढे NBARD ने भेट दिली. बचत गटाचं काम जाणून घेतलं. जर्मनीच्या तत्कालीन चान्सलर अँजेला मार्कल या भारत भेटीवर येणार होत्या. त्यांना भारतातलं बचत गटांचं काम बघायचं होत. त्यांना भेटण्यासाठी 'अंबिका बचत गटाची' निवड झाली. मार्कल यांनी 14,500 रुपयांचा चेक बचतगटाला दिला आणि आणखी काही मदतीची अपेक्षा आहे का हे विचारलं. पैशाची मदत देण्यापेक्षा आमच्या मसाल्याला जर्मनीत बाजारपेठ मिळवून द्या अशी मागणी कमलताईंनी थेट जर्मनीच्या चान्सलर बाईंना केली. त्यांनी देखील क्षणात त्यांची मागणी मान्य केली आणि मसाले निर्यातीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. खुडगावच्या झोपड्यांमध्ये बनवलेला मसाला थेट जर्मनीत पोहोचला होता.

बचत गटाचा विस्तार!

सुरुवातीला 13 महिलांनी येऊन बचत गट स्थापन केला होता. बचत गटाचे काही नियम असतात. केवळ 10-20 महिलांना एकत्र येऊन बचत गट सुरू करता येतो. परंतु हळूहळू महिला बचत गटाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ लागल्या. महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेता 2007 मध्ये  'जय अंबिका महिला सहकारी संस्था' स्थापन केली गेली. महिन्याला 6-7 लाख रुपयांचा व्यवसाय ही संस्था करते आहे. तसेच 75-80 लाखांची वार्षिक उलाढाल या महिला करतायेत.

2012-13 साली संस्थेने खुडगावातच अर्धा एकर जागा विकत घेतली असून त्या जागेवर मसाला फॅक्टरी सुरू केली आहे. उद्योगवाढीसाठी, नवीन मशीन खरेदी करण्यासाठी 2016 मध्ये नाबार्डकडून संस्थेने 53 लाख 53 हजारांचं कर्ज घेतलं.

संघर्ष अजूनही सुरू

अंबिका मसाल्याची घोडदौड सुरू असतानाच काही आव्हाने बचत गटासमोर उभी राहिली. नोटबंदी, GST, प्लॅस्टिकबंदी आणि कोरोनामुळे महिलांच्या समस्या वाढत गेल्या. GST समजून घेता घेता महिलांना 2-3 वर्षे लागली. कागदपत्रे कशी जुळवावी याचं प्रशिक्षण अजूनही त्या घेत आहेत.

2019-20 मध्ये आलेल्या कोरोना संसर्गाने सगळं जग ठप्प झालेलं असताना अंबिका मसाले उद्योगाला देखील त्याची झळ सोसावी लागली. 75-80 लाखांची आर्थिक उलाढाल असलेली संस्था 6-7 लाख वार्षिक उत्पन्न घेऊ लागली. नाबार्डचे कर्ज यामुळे रखडले. कर्ज वेळेवर न भरू शकल्यामुळे नाबार्डने संस्थेला नोटीस देखील पाठवली. विनंती-अर्ज करून त्यांना काही प्रमाणात सवलत मिळाली असली तरी संस्थेचा गाडा पूर्वपदावर अजूनही आलेला नाही. हळूहळू का होईना, पुन्हा बाजारपेठ काबीज करण्याचं ध्येय महिलांसमोर आहे.

एक छोटासा बचत गट काय किमया करू शकतो हे कमल परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं आहे. अनेक अडीअडचणी आल्या, समस्या आल्या तरीही न डगमगता महिला उभ्या राहिल्या. ध्येय-उद्दिष्टे स्पष्ट असली तर कुणीही तुम्हांला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाहीत असं कमलताई सांगतात.