मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्याची काही प्रकरणे तुमच्या वाचनात आली असतील. एवढेच नव्हे तर भाव वाढल्याने टोमॅटोच्या शेतीवर दरोडा पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.आता टोमॅटोच्या दरवाढीचा फटका रेस्टॉरंट आणि फास्ट फूड सेंटरलाही बसल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. फास्टफूडमधील प्रसिद्ध असलेल्या मॅकडोनाल्ड्स (McDonalds) कंपनीने बर्गर आणि इतर उत्पादनांमध्ये टोमॅटोचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर आणि पूर्व भारतातील सेंटर्ससाठी निर्णय-
टोमॅटोचे दर भारतात 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यातच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे क्वॉलिटीचा टोमॅटोदेखील बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे हॉटेल आणि फास्टफूड व्यावसायिकांना आवश्यक असा टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फटका मॅकडोनाल्ड्सलाही (McDonalds) बसला आहे. त्यामुळे मॅकडोनाल्ड्सच्या भारताच्या उत्तर आणि पूर्व फ्रँचायझीमध्ये यापुढे बर्गरमध्ये (McDonald's burgers) टोमॅटोचा वापर केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मॅकडोनाल्ड्स कंपनीकडून पत्रक
टोमॅटो न वापरण्या संदर्भात मॅकडोनाल्ड कंपनीकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे.त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, की सद्यस्थितीत बाजारात चांगल्या दर्जाचे टोमॅटो उपलब्ध नसल्यामुळे ते यापुढे त्यांच्या उत्पादनांमध्ये टोमॅटो देऊ शकणार नाहीत. कंपनीने भारतातील उत्तर आणि पूर्व भागांतील सेंटरसाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय घेतला असल्याचेही म्हटले आहे. तसेच आचम्या मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय खाद्य पदार्थाचा उच्च दर्जा राखण्यासाठी घेण्यात आला आहे. मार्केटमध्ये टोमॅटोचा पुरवठा सुरळीत होताच पुन्हा आम्ही ही टोमॅटोचा वापर पूर्ववत करू असेही मॅकडोनाल्ड्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.