महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या अंदाजे 12 कोटी इतकी असून त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे एक कोटी आहे. ज्येष्ठ नागरिक याचा अर्थ 60 वर्ष पूर्ण केलेला कोणताही पुरुष अथवा स्त्री असा होतो. समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे तरुण वर्ग व्यवसाय, नोकरी निमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरित होत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीही रुढ होत आहे. (Old age home scheme for senior citizen) त्यामुळे वृद्धाच्या आरोग्याकडे, गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा त्यांना जीवनसाथीचा मृत्यू झाल्यामुळे एकटे राहण्याची वेळ येते.
आर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई, यामुळे सुध्दा कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या पोषण व आरोग्यावर होत आहे. कुटुंबातील मुले, सुना काळजी घेत नसल्याने काही वृद्धांवर रस्त्यावर राहण्याची वेळ येते. अशा बेसहारा वृद्धांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना सुरू केल्या आहेत.
Table of contents [Show]
ज्येष्ठ नागरिकांसाठी‘वृद्धाश्रम’ योजना (Old age home Scheme)
अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, म्हणून शासनाने शासनाने 20 फेब्रुवारी,1963 ला वृध्दाश्रम ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेतील वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालविले जातात. आजघडीला शासनमान्यता मिळालेले 32 वृद्धाश्रम अनुदानतत्वावर चालवले जातात. या वृद्धाश्रमामध्ये निराधार, निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो.
कोणत्या सुविधा पुरवण्यात येतात? (Facilities provided in Old age home)
वृद्धाश्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्यांना निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, वैद्यकीय सुविधा इत्यादी सोयी-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान म्हणून प्रत्येक लाभार्थींसाठी प्रती महिना 900 रुपये प्रमाणे 12 महिन्यांसाठी पोषण अनुदान देण्यात येते. हे वृद्धाश्रम नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदान तत्त्वावर चालविले जातात. या वृद्धाश्रमामध्ये 60 वर्षे वय वरील पुरुष व 55 वर्षांवरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो. प्रवेशितांना स्वयंसेवी संस्थेमार्फत अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, तसेच मनोरंजनाच्या सेायी-सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येतात.
प्रवेशासाठी कोणाकडे संपर्क साधावा
प्रवेशासाठी गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधीत संस्थांकडे संपर्क साधावा.
मातोश्री वृद्धाश्रम योजना - (Matoshree vrudhashram scheme)
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आधीपासून ‘वृद्धाश्रम’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, (उदा. बाग-बगिचा, वाचनालय, दुरदर्शनवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ इत्यादी,) म्हणून सर्व सोयींनी युक्त असे ‘मातोश्री वृद्धाश्रम’ ही योजना शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दिनांक 17 नोव्हेंबर, 1995 ला स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू केली आहे.
50% जागांवर विनाशुल्क प्रवेश
या योजनेंतर्गत शासनाने 31 जिल्ह्यांमध्ये 5 एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून हे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थामार्फत विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यात आले आहेत. राज्यात सद्यस्थितीत ‘23 मातोश्री वृद्धाश्रम’ सुरू असून प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमातील नागरिकांची संख्या 100 इतकी आहे. त्यामधील 50% जागांवर शुल्क भरुन व 50% जागांवर विनाशुल्क प्रवेश देण्यात येतो.