महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र सरकारने 60 वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून 2 वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आरोग्य तपासणीसाठी ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही शुल्क द्यायचे नाहीये. याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारच करणार आहे.
Table of contents [Show]
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णायलात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्षे साठ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी होणार आहे. याबाबतचे निर्देश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
'आभा' कार्ड अनिवार्य
यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आभा (ABHA) कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर होय. भारत सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना दिलेले हे डिजीटल हेल्थ कार्ड आहे. या कार्डमध्ये नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती साठवलेली असते.या कार्डमुळे प्रत्येकवेळी डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन जाण्याची गरज उरणार नाहीये. आजवरची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री आणि घेतलेली औषधे या कार्डद्वारे बघता येणार आहेत.
ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आभा कार्ड नसेल त्यांना सरकारी दवाखान्यात नवे कार्ड बनवून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास रुग्णांना सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाची सोय देखील केली जाणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मिळेल लाभ
आरोग्य तपासणीत दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिकांना काही आजार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले गेले आहेत. याकामी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा यासाठी सदर योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला जाणार आहे. या योजनेच्या नियम व अटींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत.
राज्यात 1.50 कोटी ज्येष्ठ नागरिक
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विचार केल्यास आजघडीला राज्यात 1.50 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. इतकी मोठी लोकसंख्या लक्षात घेता सर्व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी /तपासणीसाठी आठवड्यातील 2 दिवस राखीव ठेवले जावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. येत्या 3 महिन्यांत राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.