प्रत्येकाचे आयुष्य घडवण्यासाठी घरातील ज्येष्ठांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचे कितीही गुणगाण केले तरी कमीच आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आपण आपल्या आयुष्याची वाट चालत असतो. त्यामुळे त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्यच आहे. पण, त्यांचा वाटा फक्त कुटुंबीयाच्या सुधारणेतच नाही तर समाजाच्या जडणघडणीतही आहे. त्यामुळे त्यांच्या उतारवयात त्यांना कोणत्याच आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागू नये म्हणून सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी काही महत्वाच्या योजना आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
पंतप्रधान वय वंदना योजना
केंद्र सरकारने वृद्धांना त्यांच्या आर्थिक बाबींमधून स्वातंत्र्य मिळावे यासाठी पंतप्रधान वय वंदना योजनेची सुरूवात केली आहे. या योजनेचा लाभ 60 वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती घेऊ शकते. ही योजना एलआयसीद्वारे(Life Insurance Corporation of India) चालवण्यात येत असून यात वृद्धांना 10 वर्ष गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्या नंतर त्यांना पेन्शन सुविधा त्यांच्या गरजेनुसार निवडण्याचा अधिकार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिक 100 रुपये ते 15 लाख रुपयांपर्यत गुंतवणूक करू शकतात.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही रिटायरमेंटसाठी बचत करण्यासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेत एक ठराविक रक्कम महिन्याला गुंतवल्यास, ज्येष्ठांना रिटायरमेंट नंतर मासिक पेन्शन मिळते. म्हणजेच ज्येष्ठांनी केलेल्या गुंतवणुकीनुसार त्यांना पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे रिटायरमेंटनंतर त्यांचा आर्थिक प्रश्न या योजनेत गुंतवणूक केल्यास मार्गी लागणार आहे.
वरिष्ठ पेन्शन विमा योजना
वरिष्ठ पेन्शन विमा योजनेची सुरूवात भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी केली आहे. ही योजना एलआयसीद्वारे चालवण्यात येते. या योजनेत एलआयसीद्वारे गुंतवणूक केल्यास, ज्येष्ठांना 500 रुपयांपासून 10000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. याच योजनेला एलआयसी वरिष्ठ पेन्शन विमा योजना म्हणूनही ओळखले जाते. विशेष म्हणजे ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. वयाची 60 वर्ष झाल्यावर यात गुंतवणूक करता येते.
आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम
केंद्र सरकारने 2010 मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम या योजनेची सुरूवात केली. आरोग्याशी संबंधित कोणत्याही गोष्टींसाठी या योजनेद्वारे ज्येष्ठांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत. त्यासाठी सरकाराने जागोजागी त्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तपासणी आणि उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसणार आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना (IGNOAPS) ही दारिद्ररेषेखालील (BPL) ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. तसेच, ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचा (NSAP) एक घटक असून BPL च्या यादीनुसार लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिले जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. 2007 मध्ये ही योजना सुरू केली असून ज्येष्ठांना महिन्याला एक ठराविक रक्कम देण्यात येते. 60 वर्षांवरिल व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.