केंद्र सरकारद्वारे नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. निवृत्त झालेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी देखील सरकारच्या अनेक योजना आहेत. यापैकीच एक अटल पेन्शन योजना आहे. या अंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिन्याला ठराविक रक्कम मिळते. अटल पेन्शन योजना नक्की काय आहे व या योजनेचा तुम्हाला कशाप्रकारे फायदा मिळू शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
अटल पेन्शन योजना काय आहे?
केंद्र सरकारद्वारे वर्ष 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा उपलब्ध नसते. अशावेळी वृद्ध नागरिकांना इतरांकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. मात्र, या योजनेंतर्गत नागरिकांना निवृत्तीनंतर देखील आर्थिक सुरक्षा प्राप्त होते.
दरमहिन्याला ठराविक रक्कम भरून या योजनेचा फायदा घेता येतो. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिन्याला 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये सरकारद्वारे दिले जातात.
कोणाला मिळेल अटल पेन्शन योजनेचा फायदा?
18 ते 40 वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक असलेली व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळील बँक शाखा अथवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल. त्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल.मात्र लक्षात घ्या की, आयकर भरणारी व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच, तुम्ही जर आयकर भरत असाल तर या योजनेचा फायदा मिळणार नाही.
दरमहिन्याला मिळतील 5 हजार रुपये
अटल पेन्शन योजनेंतर्गत तुम्हाला वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर आयुष्यभर दरमहिन्याला 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये मिळतील. मात्र, यासाठी तुम्हाला दरमहिन्याला ठराविक रक्कम योजनेत जमा करावी लागेल. तुम्ही 42 रुपये किंवा 210 रुपये दरमहिन्याला भरल्यास वयाच्या 60 वर्षानंतर दरमहिन्याला अनुक्रमे 1 हजार रुपये अथवा 5 हजार रुपये मिळतील.
वर्गणीदाराचा मृत्यू झाल्यास काय?
वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधीच वर्गणीदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ही रक्कम दिली जाते. मात्र, या रक्कमेमध्ये केवळ आतापर्यंत जमा झालेली पेन्शन रक्कम व त्यावरील व्याजाचा समावेश असतो. वर्गणीदाराचा जोडीदार स्वतःला हवे असल्यास हे खाते पुढे सुरू देखील ठेवू शकतो.
याशिवाय, या योजनेतून ऐच्छिकपणे बाहेर पडण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. यासाठी वर्गणीदाराला अटल पेन्शन योजनेचे खाते बंद करण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागेल. त्यानंतर ठराविक रक्कम परत केली जाईल. तुम्ही https://npscra.nsdl.co.in/ या वेबसाइटच्या माध्यमातून योजनेची माहिती, फॉर्म, भरलेले पैसे इत्यादी सर्व माहिती जाणून घेता येईल.