केंद्र सरकारद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना राबविली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून देखील दरमहिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना नक्की काय आहे? या योजनेचा तुम्हाला कशाप्रकारे लाभ मिळू शकतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना काय आहे?
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने चालवली जाणारी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेंतर्गत 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना दरमहिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. वृद्ध नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक मदतीच्या उद्देशाने सरकारद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कोणाला मिळेल या योजनेचा फायदा?
केंद्र पुरस्कृत या योजनेंतर्गत वृद्ध निराधार व्यक्तींना दरमहिन्याला पेन्शन दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रमुख पात्रता म्हणजे लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे. तसेच, वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या निराधार वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.
तसेच, लक्षात घ्या की जर आधीच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असल्यास या योजनेमध्ये तुमचा आपोआप समावेश केला जाईल. वयाची 65 वर्ष पूर्ण केल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- वयाचा दाखला – यासाठी तुम्ही जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डवरील वय नमूद केलेली प्रत किंवा मतदान ओखळपत्र पुरावा म्हणून देऊ शकता.
- व्यक्ती अथवा कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश असल्याचा पुरावा.
- महाराष्ट्राची नागरिक असल्याचे सिद्ध करणारा रहिवासी दाखला.
योजनेंतर्गत किती मिळेल निवृत्तीवेतन?
वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या वृद्ध नागरिकांना या योजनेंतर्गत दरमहिन्याला 200 रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. ही रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. तसेच, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत दरमहिन्याला 800 रुपये दिले जातात. याआधी ही रक्कम 400 रुपये होते. मात्र, जुलै 2023 मध्ये यात वाढ करण्यात आली.अशाप्रकारे, या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 1000 रुपये दरमहिना निवृत्तीवेतन मिळते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करता येईल अर्ज?
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालय/तहसलिदार, तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइटच्या माध्यमातून देखील अर्ज करता येईल.