वाहन निर्मितीतील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीच्या गाड्यांची निर्यात वाढली आहे. भारतात तयार झालेल्या गाड्यांच्या निर्यातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 वर्षात कंपनीने 2 लाख 63 हजार 68 गाड्या परदेशात निर्यात केल्या आहेत. कंपनीने या वर्षी निर्यातीचा उच्चांक गाठला आहे. मारुतीने 2021 साली सुमारे दोन लाख गाड्या निर्यात केल्या होत्या. त्यात मागील वर्षी मोठी वाढ झाली आहे.
कोणती मॉडेल्स सर्वात जास्त निर्यात झाली
मारुती सुझुकीची स्वीफ्ट डिझायर, स्विफ्ट, एस-प्रेसो, बलेनो, ब्रेझा या गाड्या सर्वात जास्त निर्यात झाल्या असे कंपनीने म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी दोन लाखांपेक्षा जास्त वाहने निर्यातीतून गाड्यांची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ग्राहकांना परवडेल अशी किंमत असल्याचे दिसून येते, असे मारुती सुझुकी इंडियाचे प्रमुख हिसाशी टाकायुची यांनी म्हटले. भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' ध्येयाशी सुसंगत आमचे ध्येय असून त्याचे पालन करत आम्ही आंतरराष्ट्रीय ग्राहकांना चांगली उत्पादने देऊन आनंदी ठेवत आहोत, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या आधी 2019 साली निर्यात केलेल्या गाड्यांपेक्षा 2022 मध्ये दुपटीपेक्षा जास्त गाड्या निर्यात केल्या. 2019 साली कंपनीने 1 लाख 7 हजार 190 गाड्या निर्यात केल्या होत्या. तर 2020 मध्ये फक्त 85 हजार गाड्या निर्यात केल्या होत्या. कोरोना निर्बंधामुळे गाड्यांची निर्यात कमी झाली होती. कपंनीने भारतामधून 1086-87 साली निर्यात सुरू केली होती. तेव्हापासून निर्यातीत सतत वाढ होत असून शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये कंपनी गाड्यांची निर्यात करते.
सध्या कंपनी आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि एशियन देशांना 16 पेक्षा जास्त मॉडेल्स निर्यात करते. कंपनीची अनेक गाड्यांची मॉडेल्स भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. 2022 मध्ये कंपनीने जगभरात 14 लाख गाड्या विकल्या.