Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन रमी गेममध्ये गमावले तब्बल 52 लाख, कर्जबाजारी युवकाची किडनी विकण्याची तयारी!

Online Games

Online Rummy Game: ऑनलाईन रमी गेमच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकताना दिसते आहे. गेम्सच्या आहारी गेलेल्या दिल्लीतील एका युवकाने तर तब्बल 52 लाख रुपये गमावले आहेत. कर्जबाजारी झालेल्या या युवकावर आता किडनी विकण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण.

Online Games खेळणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाही. एका अहवालानुसार भारतात सर्वाधिक लोक ऑनलाईन गेम्स खेळत आहेत. अशातच अनेक युवकांना या गेम्सचं व्यसन लागल्याचे आणि कर्जबाजारी झाल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. अशीच एक बातमी दिल्लीतून आली आहे. ऑनलाईन जुगार खेळल्यामुळे एक युवक देशोधडीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. कर्जबाजारी झालेल्या युवकाने स्वतःची किडनी विकण्याचा देखील निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

नैनितालमधील हल्द्वानी येथे राहणाऱ्या हरीश नामक 36 वर्षीय युवकासोबत हा प्रकार घडलाय. हरीश दिल्लीतील एका ई-कॉमर्स कंपनीत काम करत होता तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रल्हादपूर, ओखला, दिल्ली येथे राहतो आहे. गेल्या 3 वर्षांपासून त्याला ऑनलाईन रमी गेमचं व्यसन लागलं. या गेममध्ये त्याने आतापर्यंत थोडीथोडके नाही तर तब्बल 52 लाख रुपये गमावले आहेत. आता तर त्याची नोकरी देखील गेली आहे.

हरीशच्या या सवयीमुळे वैतागून लहानग्या मुलीला घेऊन त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे. हरिशने आतापर्यंत त्याची सगळी कमाई गमावली असून कर्जबाजारी झालाय.

4 बँकांकडून घेतलं कर्ज

हरीशला ऑनलाईन रमी गेम्सचं इतकं व्यसन जडलं होतं की त्याने त्याची सर्व कमाई गेममध्ये लावली. त्याने जवळपास 30 लाख रुपये पैसे ऑनलाईन रमीत गमावले होते. त्यानंतर त्याने 4 वेगवेगळ्या बँकातून 22 लाखांहून अधिक कर्ज देखील घेतलं. एकंदरीत त्याने आजवर 52 लाख रुपये गेम्सच्या नादात गमावले आहेत. आता नोकरी गेल्यामुळे हरिशला बँकेचे हप्ते देखील भरणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने त्याला नोटीस देखील पाठवली आहे.

आत्महत्येची धमकी, किडनी विकण्याची तयारी

ऑनलाईन गेम्सचं व्यसन हरीशला आता चांगलंच महागात पडलंय. गेममध्ये गमावलेली रक्कम परत घेण्यासाठी काल त्याने नोएडा येथील गेम कंपनीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच पैसे परत न दिल्यास आत्महत्येची धमकी देखील दिली.कंपनीने म्हणणे न ऐकल्यास आपण किडनी विकून कर्ज भरणार आहोत असेही हरिशने म्हटले आहे.