बँक किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज घेताना कर्जदाराची पुरती दमछाक होते. कागदपत्रांची पूर्तता करताना काही ना काही गोष्ट राहून जाते अन् शेवटच्या क्षणी कर्ज नाकारले जाते, असे कटु अनुभव अनेकांना आले असतील. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास किंवा छाननी दरम्यान काही चूक आढळ्यास कर्ज देणाऱ्या बँकेला अर्ज फेटाळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गृहकर्जाचा अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रे अगदी काळजीपूर्वक सादर करणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
अपूर्ण कागदपत्रे ठरतील मुख्य कारण
गृहकर्ज घेताना तुम्ही सादर केलेली कागदपत्रे अत्यंत महत्वाची असतात. अर्जासोबत तुम्ही दिलेल्या सर्व माहितीला संबंधित दस्तऐवजांचे समर्थन असणे आवश्यक आहे. तुमचे वैयक्तिक आणि सह अर्जदार यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मालमत्ते संबधित देयके (बिल), सॅलरी स्लीप ( नोकरदारांसाठी), ITR, Audit Report, बॅंक खात्याची विवरणे, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे इतर दस्तऐवजांसोबत सादर करावी लागतील. जर तुम्ही नोकरी किंवा तुमच्या उत्पन्नाबाबत सक्षम कागदपत्र किंवा पुरावे सादर करु शकला नाहीत तर तुमचा अर्ज फेटाळला जाण्याची दाट शक्यता आहे.
बिल पेमेंट हिस्ट्री
तुमचा क्रेडिट इतिहास आणि स्कोर तुमच्या गृहकर्जाच्या अर्जामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात आणि कर्जदाते मंजूरीचा विचार करण्याआधी या दोन्ही आकड्यांची तपासणी करतात. क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड (सिबिल) तुमचा सिबिल स्कोर देते जो तुमची क्रेडिटसाठी असलेली पात्रता दर्शवतो. जर तुमची देय थकबाकी असतील किंवा शुल्कांची सेटलमेंट झाली नसेल तर तुमची गृहकर्जासाठीची कर्ज पात्रता कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित असेलल्या कर्जापेक्षा कमी रक्कम तुम्हाला मंजूर होऊ शकते.
सध्याची कर्जे आणि परतफेडीची क्षमता
जर तुमच्यावर वर्तमान कर्जे असतील, तर कर्जदाता त्या देयांना पूर्ण करण्यासाठी लागणारी रक्कम तुमच्या उत्पन्नामधून वजा करण्यामार्फत गणन करतो. जर तुम्ही तुमच्या वर्तमान देयांसह एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये कर्जाची परतफेड करु शकत नाही असा कर्जदात्याने अंदाज काढला तर तो नवीन कर्जासाठी मंजूरी नाकारु शकतो. तुमच्या परताव्याच्या क्षमतेचे अधिक चांगले परिक्षण करण्यासाठी कर्जदाता एफओआयआर किंवा फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो नावाचा निर्देशक वापरतात.
कामाचा किमान अनुभव
अनुभवाची कमतरता तुमच्या कर्जाच्या अर्जावर नकारात्मकपणे परिणाम करु शकते, कारण उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत तुमच्या पात्रतेवर परिणाम करणारा सर्वात महत्वपूर्ण घटक आहे. बहुतांश कर्जदार सार्वजनिक किंवा खाजगी किंवा बहुराष्ट्रीय संस्थेत किमान ३ वर्षाचा कामाचा अनुभव असणारे अर्ज स्वीकारतात.
अर्जदाराचे वय
अर्जदाराचे वय देखील त्यांच्या कर्जदात्यांसाठी निर्णायक बाब असते. निवृत्तीजवळ असलेल्या कर्जदारांना दिर्घकालीन गृहकर्ज मिळणे कठीण जाते, कारण ते कदाचित सहमत झालेल्या कालावधीमध्ये कर्जाच्या रकमेची परतफेड करु शकणार नाहीत, असे कर्जदात्यांना वाटू शकते. अर्ज बरेचदा फेटाळले जातात किंवा त्यांना जादा EMI असलेली कमी कालावधीची गृह कर्जे दिली जातात. कमी वयाच्या अर्जदारांना दिर्घ मुदतीची गृह कर्ज सहज मिळते कारण ते जास्त वर्षे कार्यरत राहू शकतात. जास्त वयाच्या अर्जदारांच्या स्थितीत कमी वयाच्या सहकर्जदारासोबत अर्ज करुन ते मंजूरीच्या शक्यता वाढवू शकतात.
आधीचे अर्ज नाकारले असल्यास…
तुमच्या क्रेडिट नोंदी देखील तुमच्या आधीच्या गृह कर्ज अर्जांची –मंजूर केलेल्या आणि नामंजूर केलेल्या दोन्ही अर्जांची सूची दाखवतात. यामुळे बँकेला तुमचे पत मूल्यांकन करण्याची आणि नियमित कर्जफेड करणारे तुम्ही प्रामाणिक कर्जदार आहात हे तपासता येते. जर तुम्हाला आधी नकार मिळाला असेल तर तुमची गृहकर्ज मंजुरीची वाट आणखी बिकट होईल. त्यामुळे जेव्हा मंजुरीच्या शक्यता सर्वात जास्त असतील केवळ तेव्हाच अर्ज करणे सोयीचे ठरेल.
सिबिल स्कोर ठरतो महत्वाचा
कर्जदाते तुमच्या सिबिल स्कोरला तुमच्या अर्जाला मंजूर करण्याचा निर्णय घेण्याआधी विचारात घेतात. तुम्ही तुमचा स्कोर ७५०हून जास्त किंवा किमान ७२५ झाला की कर्जाचा अर्ज करावा. ७२५ पेक्षा कमी स्कोर नामंजूरीत किंवा अपेक्षित नसलेल्या कर्ज कालावधीत परिणामित होऊ शकतो.