आयपीएल सामने संपल्यानंतर आता सुरू होणार आहेत MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने. उद्यापासून म्हणजेच 15 जूनपासून पुण्यात या सामन्यांना सुरुवात होत आहे.महाराष्ट्रात पहिल्यांदाच IPL च्या धर्तीवर असे सामने होत असल्याने क्रिकेटप्रेमी या खेळासाठी उत्सुक झाले आहेत.
6 जून रोजी झाले खेळाडूंचे ऑक्शन
MPL मध्ये एकूण 6 संघ सामील असून प्रत्येक संघातील खेळाडू संख्या किमान 16 असेल असे आयोजकांकडून सांगण्यात आले होते. एकूण 285 खेळाडु MPL ऑक्शनमध्ये सहभागी झाले होते. आयोजकांनी ऑक्शन पर्स म्हणजेच बोलीची कमाल किंमत प्रति संघ 20 लाख रुपये इतकी ठरवली होती. तसेच खेळाडू स्पर्धकांचे 3 विभाग करण्यात आले होते. अ विभागातील खेळाडूंसाठी किमान ऑक्शन किंमत 60 हजार रुपये, ब विभागातील खेळाडूंसाठी किमान ऑक्शन किंमत 40हजार रुपये तर क विभागातील खेळाडूंसाठी ही किंमत 30 हजार रुपये इतकी ठरवण्यात आली होती.
महाराष्ट्र प्रीमियर लीग-2023 मधील संघ खालीलप्रमाणे
1. पुणेरी बाप्पा
2. कोल्हापूर टस्कर्स
3. ईगल नाशिक टायटन्स
4. छत्रपती संभाजी किंग्स
5. रत्नागिरी जेट्स
6. सोलापूर रॉयल्स
हे आहेत आयकॉन खेळाडू
पुणेरी बाप्पा: ऋतुराज गायकवाड
ईगल नाशिक टायटन्स: राहुल त्रिपाठी
कोल्हापूर टस्कर्स: केदार जाधव
छत्रपति संभाजी किंग्ज: राजवर्धन हंगरगेकर
रत्नागिरी जेट्स: अजिम काझी
सोलापूर रॉयल्स: विकी ओस्तवाल
महाराष्ट्र प्रिमिअर लीग संदर्भातील महत्त्वाची माहिती.
— CCBK: Coffee, Cricket Aani Barach Kaahi (@CCBKMarathi) June 5, 2023
महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेचा लिलाव 6 जून रोजी होणार आहे.#MPL #RuturajGaikwad #KedarJadhav @RRPSpeaks pic.twitter.com/b7Q8FTrI9z
महाराष्ट्र प्रीमियर लीग-2023 मधील विजेत्या टीम 50 लाख रुपयांचे तर उप-विजेत्या टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया MPLमधील स्टार खेळाडूंचे ऑक्शन किती रुपयांत झाले.
लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. कोल्हापूर टस्कर्स संघाने नौशादसाठी तब्बल 6 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. नौशाद पहिल्या सिजनचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
नौशादच्या खालोखाल दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटस संघाने 4 लाख 60 हजार रुपयांची बोली लावून त्यांच्या संघात घेतले आहे. तसेच कोल्हापूर टस्कर्स या संघाने साहिल औताडे याला 3 लाख 80 हजारांची बोली लावून, अंकित बावणेसाठी 2 लाख 80 हजारांची बोली लावून संघात सामील करून घेतले आहे.
तर दुसरीकडे सोलापूर रॉयल्स या संघाने त्यजित बच्छावला 4 लाख 60 हजारांच्या बोलीसह संघात स्थान दिले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर किंग्ज संघाने 2 लाख 80 हजाराची बोली लावून शमशुझमा काझीची निवड केली आहे. सिद्धेश वीर या खेळाडूला 2 लाख 60 हजारांच्या बोलीसह ,तर आशय पालकर आणि कौशल तांबेला प्रत्येकी 2 लाख 40 हजारांच्या बोलीसह ईगल नाशिक टायटन्सने संघात दाखल करून घेतले आहे.
#MPL 2023 चे सुधारित व अंतिम वेळापत्रक pic.twitter.com/mbFoq7Yct8
— #MPL ? (@MaheshMGW23) June 13, 2023
तर पुण्याच्या पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी 2 लाख 40 हजार, तर रोहन दामलेसाठी 2 लाख रुपयांची बोली लावली आहे. हे आगळे खेळाडू आता उद्यापासून महाराष्ट्र प्रीमियम लीगचे मैदान गाजवणार आहेत.
MPL चे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट या वाहिनीवर करण्यात येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना मोफत या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. तसेच एअरटेल चॅनल नं. 298, व्हिडिओकॉन चॅनल नं. 646, टाटा स्काय चॅनल नं. 453 आणि सन डायरेक्ट चॅनल नं. 302 वर देखील या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.