Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scholarship After 10th in Maharashtra: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या स्कॉलरशिप योजना

Scholarship for 10th Pass Students

Image Source : www.timesofindia.indiatimes.com

Scholarship After 10th in Maharashtra: महाराष्ट्र सरकारच्यावतीने शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. प्रत्येक जण आता अॅडमिशनच्या प्रक्रियेत व्यस्त असतील. कोणी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत असतील. अशाच इयत्ता दहावी पास झालेल्या गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनांची (Government Scholarship Schemes) माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ज्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची आहे; पण त्याची शिकण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारसह खाजगी कंपन्या, संस्था, विद्यापीठे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी स्कॉलरशिप देतात. आज आपण अशाच काही स्कॉलरशिपबद्दल जाणून घेणार आहोत.

स्कॉलरशिप म्हणजे काय?

ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नाही. अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत करणाऱ्या योजनेला स्कॉलरशिप योजना म्हटले जाते. केंद्र व राज्य सरकार तसेच विविध संस्था आणि कंपन्या या वेगवेगळ्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात. काही स्कॉलरशिपमधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरली जाते, तर काही विद्यार्थ्यांना पुस्तकांचा खर्च उपलब्ध करून दिला जातो. तर काही विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपमधून संपूर्ण खर्च दिला जातो.

या स्कॉलरशिप भारतात किंवा भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. अनेक संस्था आपापल्या नियमानुसार या स्कॉलरशिप देत असतात. यामध्ये काही संस्था भारताबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. तर काही फक्त भारतात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात. स्कॉलरशिप देणाऱ्या संस्था, कंपन्या किंवा सरकार सुद्धा त्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थित तपासूनच स्कॉलरशिप देते. यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबात कमावत्या व्यक्ती किती आहेत? त्यांच्या घरात महिन्याला एकूण किती उत्पन्न येते, याची माहिती घेऊनच स्कॉलरशिप दिली जाते.

गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ

स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने किंवा तो ज्या संस्थेत/कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे. त्यांच्या नावाने पैसे दिले जातात. स्कॉलरशिपमधून मिळालेले पैसे हे ट्युशन फी (शैक्षणिक फी), राहण्याचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासाठी वापरू शकतो. स्कॉलरशिपसाठी एक पात्रता निश्चित केलेली असते. त्या पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर बाबी तपासल्या जातात. अशा स्कॉलरशिप शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, केंद्र व राज्य सरकार, व्यावसायिक कंपन्या, धर्मादाय संस्था आणि फाऊंडेशन्स यांच्याद्वारे दिल्या जातात. स्कॉलरशिप ही आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना आणि गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते. 

महाराष्ट्र सरकारच्यावतीने शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (Open Merit Scholarships in Junior College)

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये 60 टक्के गुण मिळाले आहेत आणि ते अकरावी व बारावीचे शिक्षण घेणार असतील तर त्यांच्यासाठी सरकार शिष्यवृत्ती देते. या शिष्यवृत्ती अंतर्गत सरकार प्रत्येक महिन्याला 50 रुपये असे 10 महिन्यांकरीता शिष्यवृत्ती देते.

आर्थिक मागास विद्यार्थ्यांकरीता ओपन मेरीट स्कॉलरशिप (Open Merit Scholarships for EBC Students)

जे विद्यार्थी दहावीमध्ये चांगल्या गुणांनी पास झाले आहेत पण ते आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातून आले आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्याने पहिल्या प्रयत्नात दहावीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरकार प्रत्येक महिन्याला 150 रुपये असे 10 महिने शिष्यवृत्ती देते. पण अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 30,000 रुपये असले पाहिजे.

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती (Post-Matric Scholarship)

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागातर्फे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती फक्त अनुसूचित जाती (SC), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि नवबौद्ध (Nav Buddha) विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1200 रुपये दिले जातात.

राजर्षि छत्रपति शाहू महाराज मेरी स्कॉलरशिप (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship)

विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारतर्फे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षि छत्रपति शाहू महाराज मेरी स्कॉलरशिप दिली जाते. विशेष मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्षासाठी प्रति वर्ष 3000 रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.

विद्यानिकेतन स्कॉलरशिप (Government Vidyaniketan Scholarship)

ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विद्यानिकेतनमधून इयत्ता दहावीची परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी 1000 रुपयांची शिष्यवृत्ती सरकारकडून दिली जाते. संबंधित विद्यार्थ्यांला इयत्ता दहावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर चांगले शिक्षण घ्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे.