Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scholarship for OBC Students: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विदेशी स्कॉलरशिपकरिता अर्ज कसा करावा?

Foreign Scholarship for OBC Students

Foreign Scholarship for OBC Students: या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमातील 50 विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात जाऊन शिकण्याची संधी मिळते. या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा? ते आपण पाहणार आहोत.

Foreign Scholarship for OBC Students: मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतुने  सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. समाजाच्या विकासासाठी समाजातील मागास आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य  प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ शिक्षित असणे पुरेसे नाही, तर उच्चशिक्षित असणे ही सुद्धा गरजेची बाब आहे. अशा परिस्थितीत भारतीय समाजात आजही मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणे शक्य होत नाही.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने अशा मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी. त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यादृष्टीने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक शैक्षणिक भत्ते, स्कॉलरशिप व योजनांची अंमलबजावणी केली जाते. अनेक तरुण स्कॉलरशिपच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच स्कॉलरशिपच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते.

महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. 2023-24  या आर्थिक वर्षात परदेशी स्कॉलरशिपसाठी 15 जून 2023 पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केले.

स्कॉलरशिप कोणाला लागू होईल? 

विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असेल तर त्याला ही स्कॉलरशिप लागू होईल. महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी सुद्धा या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल. प्रवेश घेऊ इच्छित असणारे विद्यापीठ THE (Times Higher Education) या पद्धतीच्या मानांकांमध्ये 200 नंबरच्या आत असावे. तसेच जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. पीएचडीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे.

अर्ज कसा करावा?

या संदर्भात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वेबसाईटवर (Website of Other Backward Bahujan Welfare Department) जाहिरात उपलब्ध होते. विद्यार्थ्याने जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील परदेश स्कॉलरशिप योजना अर्ज या टॅबवर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा.

कोणकोणत्या क्षेत्रासाठी ही स्कॉलरशिप लागू आहे? 

कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र (Arts, Commerce, Science, Management, Law, Engineering / Architecture and Pharmacy) या सर्व क्षेत्रासाठी ही स्कॉलरशिप लागू आहे. या स्कॉलरशिपमधील एकूण जागांपैकी 30 टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तरसाठी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, यापूर्वी इतर कोणत्याही राज्य सरकारची किंवा  केंद्र सरकारची परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप घेतलेली नसावी. तसेच अन्य प्रशासकीय विभागाच्या परदेशी स्कॉलरशिपच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा. 

या स्कॉलरशिपसाठी असलेल्या अटी

विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याला मिळणारे असे एकूण कुटुंबाचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच त्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पीएचडीसाठी किमान 60 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावी. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येतो. परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही स्कॉलरशिप लागू आहे. 

या स्कॉलरशिपमध्ये कोणकोणते लाभ मिळतील?

  • विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.
  • विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च.
  • विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिल्याप्रमाणे, 
  • किंवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रामाणे ती रक्क्म निर्वाह भत्ता म्हणून लागू असेल.
  • विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च लागू असेल.