Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो? त्याची प्रक्रिया, पात्रता आणि नियम काय आहेत?

Govt Scholarship Scheme

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिप ही हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देते.

प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन मनासारखं करिअर करायचं असतं. यासाठी ते प्रचंड मेहनतही घेतात. पण काही क्षेत्र/फिल्डमध्ये करिअर करताना मुलांची आर्थिक ओढाताण होते. घरातून पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने मुलांना शिक्षणाचे इतर मार्ग शोधावे लागतात. अशावेळी गरजू आणि हुशार मुलांना सरकारी स्कॉलरशिपची भरपूर मदत होते. या स्कॉलरशिपच्या मदतीने अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:बरोबरच देशाचे नावही रोशन केले आहे.  

केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सरकार प्रोत्साहन देते. सरकारकडून दहावी, बारावी, ग्रॅज्युएट (पदवी), पोस्ट-ग्रॅज्युएट (पदव्युत्तर) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाते.

केंद्र आणि राज्य सरकारकडूनही मिळते शिष्यवृत्ती

केंद्र सरकारने स्कॉलरशिपचे महत्त्व आणि राज्यातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवर नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल (National Scholarship Portal-NSP)ची  स्थापना केली. या पोर्टलच्या माध्यमातून सरकारने वन स्टेप सोल्युशन उपलब्ध करून दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सध्या वेगवेगळ्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत आहे. यामध्ये शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, विज्ञान, स्पोर्ट्स तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देत आहे.

स्कॉलरशिपसाठी पात्रता काय?

प्रत्येक स्कॉलरशिपसाठी वेगवेगळी पात्रता आणि नियम सरकारने निश्चित केले आहेत. तसेच ही स्कॉलरशीप देताना संबंधित विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता, त्याला मिळालेले गुण, त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती, तसेच काही स्कॉलरशीप या जात प्रवर्गानुसारही दिल्या जातात. केंद्र सरकारने Scholarships.gov.in या साईटवर उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विभाग, कामगार आणि रोजगार विभाग, शालेय शिक्षण-उच्च शिक्षण, रेल्वे विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आदी विभागांद्वारे स्कॉलरशिप दिली जाते.

महाराष्ट्र सरकारचे स्कॉलरशिपसाठी स्वतंत्र वेबपोर्टल

केंद्र सरकारबरोबरच युजीसी आणि ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (UGC & AICTE) यांच्याद्वारेही काही स्कॉलरशिप दिल्या जातात. याची माहितीही पात्रतेसह केंद्र सरकारच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. केंद्र सरकार, केंद्रीय पातळीवरील संस्था यांच्याबरोबरच राज्य सरकारही वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत असतात. महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यासाठी mahadbt वेबसाईट सुरू केली. या साईटच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देत आहे.

महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, इतर मागास वर्ग, विमुक्ती जाती-जमाती विभाग, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, कला संचालनालय, महात्मा फुले कुषि विद्यापीठ आणि कौशल्य विकास आदी विभागांमार्फत पोस्टमॅट्रिक आणि प्री-मॅट्रिक स्कॉलरशीप योजना राबवल्या जातात. या प्रत्येक योजनांची माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत.