• 28 Nov, 2022 16:46

महाराष्ट्रच देशाचे आर्थिक इंजिन! केंद्र सरकारला मिळाला राज्यातून 23000 कोटींचा जीएसटी

GST Collection, GST Tax

Maharashtra become biggest contributor in GST वेदांत - फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताना दिसत असले तरी देशाच्या अर्थचक्राला महाराष्ट्र गती देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ऑक्टोबर महिन्यातील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलनात महराष्ट्रातून तब्बल 23 हजार कोटींचा महसूल केंद्र सरकारला मिळाला आहे.

एकीकडे मोठमोठे प्रकल्प हे महाराष्ट्रातून बाहेर जात असले तरी महाराष्ट्रचं  देशाचे आर्थिक इंजिन असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ऑक्टोबर महिन्याची जीएसटी संकलनाची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली. यात वस्तू व सेवा कर महसुलात महाराष्ट्राने अव्वल स्थानी राहण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला सर्वाधिक 23 हजार कोटी जीएसटीमधून मिळाले. तर गुजरातमधून महाराष्ट्राच्या कर संकलानाच्या निम्म्याहून कमी म्हणजे 9 हजार 469 कोटींचा जीएसटी केंद्र सरकारला प्राप्त झाला. 

सरत्या ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून केंद्र सरकारला 1,51,718 कोटींचा महसूल मिळाला. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये केंद्र सरकारला जीएसटीतून 1.67 लाख कोटींचा महसूल मिळाला होता. एका महिन्यात दिड लाख कोटींचा महसूल प्राप्त होणारी ही दुसरी वेळ आहे.यापैकी सुमारे 15% वाटा महाराष्ट्राने उचलला. महाराष्ट्रातून 23,007 कोटी इतके कर संकलन झाले. सप्टेंबर महिन्यात 21 हजार 403 कोटीचा आकडा गाठला  होता. यात तब्बल 1600 कोटींची वाढ झाली. यावर्षी चौथ्यांदा महाराष्ट्राने जीएसटी महसुलाचा 23 हजार कोटींचा टप्पा ओलांडला. एप्रिल महिन्यात विक्रमी 27 हजार 495 कोटी इतके कर संकलन करण्यात यश आले होते. यामुळे वेदांत - फॉक्सकॉन,  टाटा एअरबस सारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताना दिसत असले तरी देशाच्या अर्थचक्राला महाराष्ट्र गती देत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

महाराष्ट्राखालोखाल जीएसटी कर गोळा करण्यात शेजारच्या कर्नाटक राज्याचा वाटा आहे. कर्नाटकने 10 हजार 996 कोटींचा जीएसटी संकलित केला. तामिळनाडूमधून 9 हजार 540 कोटी,  गुजरातमधून 9 हजार 469 कोटी आणि उत्तर प्रदेशातून 7,839 कोटींचा जीएसटी केंद्र सरकारला मिळाला आहे. 

कर संकलनवाढीची कारणे काय ?

वस्तू व सेवांची दरवाढ , व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर -अनुपालन यामुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे वित्त अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर दसरा - दिवाळी या सणासुदीत ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून वस्तू व सेवा कराच्या संकलनात वाढ झाल्याचे दिसून आले. 

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कर संकलनाची आकडेवारी 

राज्य     

एकूण कर संकलन     

महाराष्ट्र

२३ हजार ७ कोटी

कर्नाटक

१० हजार ९९६ कोटी

तामिळनाडू

९ हजार ५४० कोटी

गुजरात

९ हजार ४६९ कोटी

उत्तर प्रदेश

७८३९ कोटी