मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) हे अतिशय प्रसिध्द असे ठिकाण आहे. या रेसकोर्सचा करार गेल्या 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. तेव्हापासून आजतोवर यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. यामुळे गेल्या 10 वर्षात तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला आहे. सदर भूखंडावर एक थीम पार्क (Theme Park) उभारण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने (BMC) आखली असून त्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सदर भूखंडापैकी केवळ 30% जागा ही मुंबई महानगरपालिकेची असून उर्वरित 70% जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे रेसकोर्सचा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर बीएमसीने राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला होता , परंतु काहीच कारवाई न झाल्यामुळे 10 वर्षांपासून या भूखंडाचे भाडे बीएमसीला घेता आलेले नाही.
काय होता भाडेकरार?
महालक्ष्मी येथील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला (Royal Western India Turf Club) रेसकोर्स व्यवस्थापनासाठी 99 वर्षांच्या कराराखाली हस्तांतरित करण्यात आला होता. 1914 साली झालेला हा करार 2013 साली संपला. राज्य सरकारच्या मालकीच्या या भूखंडाच्या भाडेकराराचे आणि त्याच्या नूतनीकरणाचे अधिकार मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत.आतापर्यंत रेसकोर्सची देखभाल, डागडुजी ही क्लबमार्फत घेतली जात होती.
थीम पार्कशी संकल्पना
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर या जागेवर भव्य थीम पार्क बनवण्याची शिवसेनेची संकल्पना होती. याबाबतचा ठराव महानगरपालिकेच्या बैठकीत संमत देखील केला गेला होता. परंतु तत्कालीन राज्य सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या जागेचे भाडे आले नाही आणि पुनर्विकास देखील झाला नाही. आता मात्र थीम पार्कसंबंधी हालचालींना वेग आला आहे.
महसूल का बुडाला?
10 वर्षांपूर्वी भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर त्याचे नुतनीकरण झाले नाही.त्यामुळे रेसकोर्सकडून महानगरपालिकेने भाडे देखील घेतले नाही, कारण भाडे घेतले असते तर अप्रत्यक्षपणे भाडेकराराला संमती आहे असा संदेश गेला असता.तसेच थीम पार्कची योजना देखील प्रस्तावित होती, परंतु त्यावर निर्णय काही घेतला जात नव्हता. अशाप्रकारच्या दिरंगाईमुळे मुंबई महानगरपालिकेचा तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला आहे.