Loan Incentives to women : महिला सक्षमीकरण व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून विशेष योजना राबवल्या जातात. सरकार सोबतच अनेक बँका व वित्तसंस्था सुद्धा कर्ज घेणाऱ्या महिलांना विशेष सवलती देऊन आर्थिक सहाय्य करत असतात. त्यामुळे एक महिला म्हणून तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वत:चे घर विकत घ्यायचे असेल आणि त्यासाठी पैसा उभा करायचा असेल तर बँकाच्या व वित्तसंस्थाच्या या योजनाबद्दल जरून जाणून घ्या.
व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर
महिला व्यावसायिकेला व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर चांगल्या सवलती मिळतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून व्यावसायासाठी कर्ज घेणाऱ्या महिलेला 10 लाखापर्यंतच्या कर्जावर 8.70 किंवा 8.90 टक्के व्याज आकारले जाते. तर मुद्रा लोनच्या अंतर्गत सुद्धा सरकारने नेमुन दिलेल्या बँकाकडून 10 ते 15 टक्क्यापर्यंतच्या व्याजावर कर्ज दिले जाते. याशिवाय अनेक बँकाकडून विविध महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी विशेष निधी वा योजना असतात. या योजनाच्या माध्यमातून कर्ज घेतल्यास महिलांना ही कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चांगली मदत मिळते. तसेच कर्ज परतफेड कालावधी, व्याजदर अशा विविध बाबतीत सुद्धा बँका वा वित्तसंस्थाकडून विशेष सहाय्य केलं जातं.
गृहकर्जावरील सवलती
SBI, HDFC, कॅनरा व युनियन बँक ऑफ इंडिया अशा काही बँकाकडून महिलांच्या नावे गृहकर्ज घेतल्यास कमी व्याजदर आकारणी करतात. SBI बँकेकडून कर्ज घेणाऱ्या महिलेचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. त्यानुसार बँकेकडून 5 बेसिक पॉइंट सवलतीवर 9.15 ते 10.15 टक्क्याच्या व्याजावर कर्ज दिले जाते. HDFC बँकेमध्ये सुद्धा 5 बेसिक पॉइंटवर 8.95 ते 9.85 टक्क्याने कर्ज दिलं जातं. तर कॅनरा बँकेकडून 8.85 टक्क्यांने कर्ज देतात.
आणखी एक फायदा म्हणजे महिलांच्या नावे घर खरेदी केल्यावर स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा 1 ते 2 टक्क्यांने सूट दिली जाते. अनेक राज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.