भारतीयांची ओळख ही विविधतेशी आणि त्यांच्या सणांशी जोडली गेली आहे. त्याच सणांपैकी एक सण म्हणजे गुढी पाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण महाराष्ट्रीयन लोक मोठ्या थाटात साजरा करतात. दारात रांगोळी, पाटावर उंच उभी गुढी, चौकटीला तोरण आणि गरमागरम पुरण पोळी असा साजेसा बेत प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळतो. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून अनेकजण आपल्या घरांमध्ये नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. या खरेदीमध्ये एक गोष्ट हमखास घेतली जाते, ती म्हणजे 'सोने' (Gold).
मुळात गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपराच आहे. आपल्या आजी-पंजीपासून आपण ही परंपरा जपली आहे. पण गेल्या 2 दिवसात सोन्याचा दर 60 हजारांच्याही वर गेलाय. याशिवाय महागाई देखील प्रचंड वाढली. अशा परिस्थितीत सोने कसे खरेदी करायचे? असा प्रश्न नक्कीच तुमच्यापुढे पडला असेल, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला सोने खरेदी करण्याचा एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने अगदी कमी पैशात तुम्ही गुढीपाडव्याला सोने खरेदी करू शकता.
सोने हा स्त्रियांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्याचबरोबर सोने ही एक प्रकारची गुंतवणूक (Investment) ही आहे. भविष्यातील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आजच्या घडीला केलेली गुंतवणूक म्हणून आपण सोन्याकडे पाहू शकतो. पण गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये हल्ली महागाई प्रचंड प्रमाणावर वाढलीये. असे असले तरी तुम्ही डिजिटल गोल्डच्या (Digital Gold) मदतीने तुमच्या बजेटमध्ये या पाडव्याला सोने खरेदी करू शकता.
डिजिटल गोल्ड म्हणजे काय?
डिजिटल गोल्ड (Digital Gold) हे ऑनलाईन सोने खरेदी करण्याचे एक माध्यम आहे. तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये (Digital Wallet) तुम्ही हे सोने खरेदी करू शकता किंवा विकू शकता. महत्त्वाचे म्हणजे या सोन्यावर कोणतेही मेकिंग चार्जेस (Making Charges) लागू होत नाहीत. फक्त ग्राहकाला त्यावर जीएसटी (GST) भरावा लागतो. याशिवाय आपल्या घरातील सोन्याप्रमाणे त्याला विशेष सुरक्षेची गरज नाही. तुम्हाला हव्या तितक्या म्हणजे फक्त 500 रुपयांमध्येही तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. हीच डिजिटल गोल्डची खासियत आहे.
डिजिटल गोल्ड कुठे खरेदी करता येते?
आता तुम्ही म्हणाल, ते खरेदी कसे करायचे? तर सोपे आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर त्यावरील अॅपवरून देखील तुम्ही घरबसल्या डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमधील पेटीएम (Pay-Tm), गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) अॅपमध्येही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
भारतात केवळ तीनच कंपन्या डिजिटल गोल्डच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. ज्यामध्ये एमएमटीसी लिमिटेड (MMTC Limited), ऑगमेंट गोल्ड लिमिटेड (Augment Gold Limited) आणि स्विस फर्म एमकेएस पीएएमपी (Swiss firm MKS PAMP) या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड प्रत्यक्ष सोन्यामध्ये बदलू शकता. मात्र ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतील. त्यानंतर तुम्ही सोने मिळवू शकता. त्यामुळे यंदाच्या पाडव्याला महागाईची चिंता सोडा आणि घरी घेऊन या ‘डिजिटल गोल्ड’.