Gold Price Today: अमेरिकेतील बॅकिंग सेक्टरमध्ये झालेल्या पडझड आणि येऊ घातलेल्या आर्थिक मंदीच्या इशाऱ्यानंतर सोमवारी (दि. 20 मार्च) सोन्याने प्रथमच 60 हजाराचा टप्पा पार केला आहे. एकीकडे शेअर मार्केटमध्ये सकाळी घसरण होत होती. पण गोल्ड मार्केटमध्ये सोने मजबूत होत होते. सोन्याचा भाव 60,455 रुपयांपर्यंत पोहोचला होता. ऐन गुढी पाडव्याला एक दिवस शिल्लक असताना सोन्याच्या भावात झालेल्या या वाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात सोन्याचा भाव हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील महागाई अजूनही आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही. तिथल्या बॅंकिंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. त्यात आर्थिक मंदीची चाहुलामुळे अनेक कंपन्या डबघाईला येऊ लागल्या आहेत. त्यात आज (दि. 20 मार्च) MCX वर सोन्याच्या किमतीने हायटाईम गाठला असून प्रति 10 ग्रॅम सोन्याने 60,000 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोन्याची किंमत वाढण्यामागे अमेरिकेतील बॅंकिंग सेक्टरमध्ये झालेल्या पडझडीचे कारण सांगितले जाते. कारण मागील आठवड्यात सुईस बॅंकेवर आलेल्या संकटामुळे अनेक बॅंकांचे धाबे दणाणले होते. त्यावर युबीएस बॅंकेने क्रेडिट सुईस बॅंकेला मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे थोड्याफार प्रमाणात बॅंकिंग सेक्टरला दिलासा मिळाला आहे. पण यामुळे संपूर्ण या सेक्टरवरील संकट दूर होणार नाही. त्याची टांगती तलवार अजूनही आहे. परिणा जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण होत असल्याचे दिसून येते. भारतातही त्याचा परिणाम दिसून आला. सकाळपासून सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. दरम्यान फेडरल रिझर्व्हची 22 मार्च रोजी बैठक होणे अपेक्षित आहे. या बैठकीत व्याजदर वाढवण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे मार्केटमधील तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याचा भाव येणाऱ्या काळात आणखी वाढणार असून तो 64,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आयआयएफएल सिक्युरिटीजचे कमोडिटी अॅण्ड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते, पुढील महिन्यात 10 ग्रॅम सोने 62,000 रुपयांवर पोहचू शकते. त्याची सुरूवात झाली असून सोने आणि चांदी या दोन्ही धातूमध्ये ती तेजी दिसून येते. सोन्याने चांगला परतावा देणाऱ्या इतर सर्व गुंतवणूक प्रकारांना मागे टाकले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            