Fantasy Esports Startup fanclash layoff जगभरात आर्थिक मंदीच्या कारणास्तव अनेक कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. जगभरातील नामांकीत कंपन्या जसे की, गूगल, अॅमेझोन, व्हर्जिन ऑर्बिट, सेल्सफोर्स, डिस्ने या कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली आहे. अनअॅकॅडमी, शेअरचॅट सारख्या स्टार्ट-अप कंपनीने सुद्धा कॉस्टकटींग केले. नोकरकपात ही कोणत्या एका क्षेत्रापूरती मर्यादित राहिली नसून तंत्रज्ञान, शिक्षण, ऑटो-मोबाईल अशा विविध क्षेत्रात नोकरकपातीचे वारे 2022 पासून वाहत आहे.
गेमिंग क्षेत्रातील फॅन्टसी इ-स्पोर्ट च्या फॅनक्लॅश या स्टार्टअप कंपनीनेही मार्च अखेर आपल्या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील दोन महिन्याचा पगार देत आपले काम थांबवण्याच्या सुचना कंपनीने दिल्या आहेत.
फॅनक्लॅशने का केली नोकरकपात
जून 2022 मध्ये या कंपनीने सिक्विओ या परदेशी कंपनीकडून (Sequoia) 4 कोटी अमेरिकन डॉलरचा निधी उभा करत जागतिक बाजारपेठेत आपले पाय रोवले होते. मात्र, जुलै 2022 मध्ये केंद्र सरकारने बॅटल रॉयल गेम बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया (BGMI) या मोबाईल गेमवर बंदी घातली. यामुळे फॅनक्लॅश सगळा आर्थिक डोलारा कोलमडला. कारण या कंपनीला सर्वाधिक उत्पन्न हे या खेळाच्या माध्यमातून मिळत होते. छोट्या-छोट्या शहरामध्ये हा मोबाईल खेळ खूप लोकप्रिय होता. मात्र, सरकारने या खेळावर बंदी आणताच या कंपनीचे उत्पन्न कमी झाले. अखेर कंपनीला नोकरकपातीचा कठोर निर्णय घ्यावा लागला.
फॅनक्लॅशची अन्य मोबाईल गेम्स
बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया (BGMI) या मोबाईल गेम शिवाय फॅनक्लॅशची फ्रीफायर (Free Fire), सीओडी मोबाईल (COD Mobile), सीओडी पिसी (COD PC), वेलोरेंट (Valorant), सीएस:गो (CS:GO), लिग ऑफ लिंजेट्स (League of Legends) आणि डोटा 2 (DOTA 2) हे गेम्स सुद्धा आहेत. मात्र, या गेम्समधून पुरेसे उत्पन्न कंपनीला मिळत नाही.
नोकरकपातीशिवाय अन्य निर्णय
फॅनक्लॅश कंपनीने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नोकरकपातीशिवाय अन्यही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. फॅन्टसी वेब 3 गेमिंग प्लेटफॉर्म, फॅनगिल्ड या प्लॅटफॉर्म्सचा वापर वापरकर्त्यांसाठी बंद केला. तसेच फॅनस्पेस या वापरकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेले पेज ही कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, क्रिकेट आणि फुटबॉलचे चाहते हे मोबाईलवरील व्हर्च्यूअल खेळामध्ये सक्रियपणे सहभाग घेत नाहीत. हे निदर्शनास आल्यावर फॅनक्लॅश कंपनीने आजपासून सुरू झालेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL) च्या मुहूर्तावर क्रिकेट विश्वामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.