सध्या संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अनेक मोठं मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी ‘Unacademy’ आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. या कंपनीने देखील नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपनीने गेल्या पाच महिन्यात चक्क चार वेळा नोकरकपात केली आहे.
कंपनीचे सीईओ गौरव मुंजाल (Gaurav Munjal) यांनी कर्मचाऱ्यांना मेसेज लिहून, माफी मागत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. सध्याच्या कर्मचारी संख्येपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे 380 कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. Unacademy च्या या नोकरकपातीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
नोकरकपात करण्याचे कारण काय?
कंपनीचे सीईओ गौरव मुंजाल (Gaurav Munjal) यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, कंपनीला प्रोफिटेबल बनवण्यासाठी आणि योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे, जो अतिशय कंपनीसाठीही अवघड आहे.
हा निर्णय घेताना त्यांनी कर्मचाऱ्यांना एक मेसेज लिहिला, ज्यामध्ये असे लिहिले की, डियर टीम, मला कधीच वाटलं नव्हतं की, मला असा मेसेज तुमच्यासाठी लिहावा लागेल. हा निर्णय घेणं माझ्यासाठी अतिशय त्रासदायक आहे. मात्र कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला हा निर्णय सध्याच्या परिस्थितीत घ्यावा लागतोय. सध्या कंपनीतील कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांची आम्ही कपात करत आहोत. जेणेकरून कंपनी आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकेल. मी असा निर्णय घेतल्याचा मला नेहमीच खेद राहील.
नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळतील ‘या’ सुविधा
Unacademy ने 380 कर्मचाऱ्यांची नोकर कपात केली असली तरीही, कर्मचाऱ्यांना बाय बाय करण्यापूर्वी त्यांना 1 महिन्याचा आगाऊ पगार कंपनीने दिला आहे. जेणेकरून नवीन नोकरी मिळेपर्यंत कर्मचाऱ्याला आणि त्याच्या परिवाराला आर्थिक संकटातून जावे लागणार नाही. तसेच 6 महिन्यांचा हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे. याशिवाय नोकरी मिळवण्यासाठी करिअर सपोर्ट आणि प्लेसमेंटच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येतील. ज्याच्या मदतीने कर्मचारी लवकरात लवकर नवीन नोकरी शोधू शकतात.
Unacademy बद्दल जाणून घ्या
2015 मध्ये गौरव मुंजाल,हिमेश सिंग आणि रोमन सैनी यांनी मिळून Unacademy या E-Learning प्लॅटफॉर्मची उभारणी केली. या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. जसे की JEE, NEET, UPSC, CA, GATE, UPSC NDA, CUET, बोर्ड इ. याशिवाय काही पायाभूत अभ्यासक्रम आणि कौशल्यावर आधारित कोर्सेस शिकवले जातात. हे संपूर्ण काम E-Learning प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जाते.
2019 मध्ये कंपनीने सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल विकसित केले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना देशभरातील शिक्षकांद्वारे इंग्रजी, हिंदी, पंजाबी, तेलगू, तमिळ, मल्याळम, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी इत्यादी 14 भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेता आले.