19 मे 2023 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही नोटबंदी लागू झाल्यानंतर भारतीयांना त्यांच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी अथवा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच पुढील 4 दिवसांत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून घेता येणार आहेत, त्यानंतर ग्राहकांकडे असलेल्या 2 हजारांच्या नोटांचे काय होईल याबद्दल RBI ने कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाहीये.
Table of contents [Show]
वाट बघू नका, घाई करा
नोटबंदीची घोषणा केल्यानंतर नागरिकांना आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे. तसेच पुरेसा वेळ दिल्यामुळे नागरिकांनी बँकासमोर उगाचच गर्दी करू नये असे देखील आरबीआय गवर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले होते. मात्र आता शेवटचे 4 दिवस बाकी असताना, नोट बदलून घेण्यासाठी परत मुदतवाढ दिली जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. मुदतवाढीची वाट न बघता लवकरात लवकर जवळच्या बँक शाखेत जाऊन 2 हजारांच्या नोटा बदलून घेणे शहाणपणाचे ठरणार आहे.
ज्या नोटा आरबीआयकडे येणार नाहीत, त्या नोटांचे नेमके काय होणार हे देखील आरबीआयने जाहीर केलेले नाही. त्यामुळे पुढील निर्णयाची वाट न बघता तुमच्याकडील 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करायला हव्यात.
किती नोटा आल्या परत?
RBI ने दिलेल्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 93 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. बँकाकडे परत जमा झालेल्या नोटांचे मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
किती नोटा बाकी?
1 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 93 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असून आता केवळ 7% नोटा चलनात आहेत. 1 सप्टेंबरनंतर बँकामध्ये 2 हजारांच्या नोटांची आवक अजूनही कायम आहे. त्यामुळे बाकी राहिलेल्या नोटा देखील मुदतीत परत केल्या जातील अशी अपेक्षा आहे. व्यवहारात असलेल्या नोटांचे मूल्य 0.24 लाख कोटी रुपये असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
द्यावे लागेल स्पष्टीकरण
30 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना त्यांच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या नोटा बदलून घेता येतील. भलेही 19 मे 2023 रोजी आरबीआयने या नोटा चलनातून रद्द केलेल्या असल्या तरी, 30 सप्टेंबरपर्यंत या नोटांना वैधानिक मान्यता असणार आहे. 30 सप्टेंबरनंतर बँक किंवा इतर दुकानदार देखील या नोटांचा स्वीकार करणार नाहीये.
बँकांकडे मुदतीनंतर पैसे जमा करायचे असतील तर ग्राहकांना वेळेत पैसे जमा का केले नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. येत्या काही दिवसांत याबाबत आरबीआय सूचनापत्र काढण्याची शक्यता आहे.