टॅक्स रिटर्न फायलिंगची अंतिम मुदत हळुहळू जवळ येत आहे. मात्र टॅक्स पेअर्ससाठी वेगळीच समस्या उभी राहिली आहे. इन्कम टॅक्सची वेबसाईट डाऊन असल्याने ITR फायलिंगची प्रक्रिया खूपच विलंबाने होत आहे. साईटवर ट्राफिक वाढल्याने बेवसाईटची गती थंडावली आहे. परिणामी आयटीआर (Income Tax Return) फायलिंगसाठी मुदत वाढ देण्याची मागणी अर्थात #Extend Due Date Immediately हा ट्रेंड सध्या सोशल मिडियात चर्चेत आहे.
मागील दोन दिवसांत #Extend Due Date Immediately या ट्रेंडिंग टॉपिकला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, या मागणीला सीए, टॅक्स कन्स्लटंट, वैयक्तिक करदाते यांच्याकडून मिळणारा पाठिंबा दिवसागणिक वाढत आहे. काही जणांनी थेट ट्विट करुन वेबसाईटवर येणाऱ्या अडचणींची जंत्रीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister, Govt of India) आणि इन्कम टॅक्स विभागासमोर मांडली आहे. या संदर्भात दोन दिवसांत तब्बल 22,000 हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे हा ट्रेंडिंग टॉपिक चर्चेत आला आहे.
आजपासून केवळ 3 दिवस शिल्लक आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबपोर्टलवर आयटीआर फायलिंगची प्रक्रिया अखंड सुरु आहे. करदाते येत्या 31 जुलै 2022 रोजी रविवारी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत रिटर्न फाईल करु शकतात. मुदतवाढीच्या मागणीला जोर येत असला तरी मुदतवाढीची शक्यता तूर्त कमी आहे, असे जाणकार सांगतात. त्याशिवाय केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयाकडून अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर फाईल करावा, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका, असे वारंवार आवाहन केले जात आहे.
टॅक्स रिटर्नसाठीची डेडलाईन चुकली किंवा त्यानंतर विवरणपत्र सादर केले तर करदात्याला त्यावर विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागेल. इन्कम टॅक्सच्या आकडेवारीनुसार 27 जुलै 2022 पर्यंत 3.4 कोटी 'आयटीआर'चे फायलिंग झाले आहे. त्यापैकी 2.7 कोटी ITR व्हेरिफाय झाले आहेत. गेल्या वर्षाची तुलना केली तर 31 जुलै, 2022 पर्यंत 2.5 कोटी ITR भरले जातील, असा अंदाज सरकारकडून व्यक्त केला जात आहे.