पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत भारतातील बहुतांश लोकं बँकेशी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत बँक खाते उघडणाऱ्या महिलांचा आकडा देखील मोठा आहे. देशातील एकूण बँक खात्यांपैकी जवळपास 35 टक्के खाती ही महिलांची आहे. मात्र, यातील केवळ 20 टक्के बँक खात्यांमध्येच नियमित पैसे जमा केले जातात.
महिलांचे स्वतःचे बँक खाते असल्यास त्यांना अनेक फायदे मिळू शकतात. आर्थिक समावेशनासह सरकारी योजनांचा लाभ घेण्यास देखील यामुळे मदत मिळते.
या लेखातून प्रत्येक महिलेने बँक खाते का उघडायला हवे व स्वतःचे बँक खाते असल्यास महिलांना काय फायदे मिळू शकतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
आर्थिक समावेशनास मदत
महिलांचे स्वतःचे बँक खाते असल्यास त्यांच्या आर्थिक समावेशनास मदत मिळू शकते. विशेषता ग्रामीण भागातील महिलांपर्यंत बँकेच्या सेवा पोहचत नाहीत. तसेच, सरकारच्या विविध योजनांचा देखील लाभ घेता येत नाही. मात्र, स्वतःचे खाते असल्यास ते बँकेशी जोडल्या जाऊ शकतात. घरबसल्या त्यांना आर्थिक व्यवहार करता येईल. याशिवाय, आतापर्यंत ज्या महिला घरातच पैसे साचवून ठेवत असे, त्यांना बचतीसाठी बँक खात्याच्या स्वरुपात एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.
आर्थिक स्वातंत्र्य
बँक खात्यात सुरक्षितरित्या पैसे ठेवतात येतात. यामुळे महिलांना खर्च, बचत व इतर आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र्यपणे निर्णय घेता येतात. आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे इतरही मार्ग यामुळे उपलब्ध होतात.
आर्थिक सुविधांचा घेता येईल फायदा
स्वतःचे बँक खाते असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे आर्थिक सुविधांचा लाभ घेता येतो. बँक खात्याच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग, कर्ज सारख्या सुविधांचा फायदा मिळतो. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी यूपीआय बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे असते. त्यामुळे बँक खाते असल्यास महिलांना यूपीआयच्या माध्यमातून घरबसल्या आर्थिक व्यवहार करता येतील.
सरकारी योजनांचा लाभ
सरकारद्वारे महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे. सरकारद्वारे पंतप्रधान मातृवंदन योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आवास योजना इत्यादी योजनेंचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे डीबीटीचा ( Direct Benefit Transfer ) फायदा घेण्यासाठी महिलांचे बँक खाते असायलाच हवे.
इतर सुविधा
अनेक बँक महिलांसाठी विशेष योजना आणत असतात. याशिवाय, महिलांना विशेष सुविधा उपलब्ध असणारे बँक खाते देखील उघडता येते. अशा बँक खात्याच्या माध्यमातून ठेवींवर उच्च व्याजदर, लॉकर शुल्कात सवलत, विमा सुविधा, कर्जावरील व्याजदरात सवलत आणि कॅशबॅक सारख्या सुविधांचा फायदा मिळतो. त्यामुळे अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वतःचे बँक खाते उघडणे गरजेचे आहे.