Udayan Shalini Fellowship: महिलांचा नोकरीतील टक्का पुरुषांच्या तुलनेत अद्यापही कमी आहे. देशातील सुमारे 75% महिला परावलंबी आहेत, असे अनेक अहवालांतून समोर आले आहे. फक्त 25 टक्के महिला नोकरी व्यवसायात आहेत. हे चित्र पालटण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. पुढील 5 वर्षात दहा हजार महिलांना रोजगार मिळून देणाऱ्या एका महत्वाकांक्षी उपक्रमाची माहिती या लेखात घेऊया.
शादी.कॉम आणि उदयन केअरचा संयुक्त उपक्रम
मंगळवारी देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल. मात्र, महिलांना आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शादी डॉट. कॉम कंपनीने उदयन केअर या महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी सहकार्य केले आहे. महिलांना रोजगारासाठी कौशल्य विकास आणि इतर सहाय्य करण्यासाठी शादी.कॉम उदयन केअर स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदत करणार आहे. याचा फायदा दहा हजार महिलांना होणार आहे.
उदयन शालिनी फेलोशिप
उदयन शालिनी फेलोशिप या योजनेतंर्गत 10 हजार महिलांना रोजगारक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी शादी.कॉम ही कंपनी अर्थसहाय्य करणार आहे. कमी उत्पन्न गटातील गरजू महिलांना या फिलोशिपद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच कौशल्य आधारित व्होकेशनल कोर्सेस, प्रशिक्षण, नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. उदयन केअर या स्वयंसेवी संस्थेला यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क करू शकता.
77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शादी.कॉम ने हे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी उदयन केअर या महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई सारख्या शहरांमध्येही उदयन शालिनी फेलोशिप कार्यक्रम राबवला जातो. तसेच देशातील 13 राज्यातील विविध शहरातील महिला, मुलींना आर्थिक मदत, प्रशिक्षण देण्यात येते.
2002 सालापासून उदयन केअर ही स्वयंसेवी संस्था महिलांसाठी काम करत आहे. उदयन शालिनी फेलोशिपचा आत्तापर्यंत सुमारे 14 हजार महिला, मुलींना लाभ घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक मदतही करण्यात येते. या फेलोशिपबद्दल तुम्हाला उदयन केअर एनजीओच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती पाहायला मिळेल.