महागाईत इंधनाचा (fuel) वाटा मोठा असतो. अलीकडेच म्हणजे मे, 2022 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करात (excise duty) कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलच्या दरात लिटरमागे आठ रुपयांनी तर डिझेलच्या दरात लिटरमागे सहा रुपयांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेलसारखी इंधने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. त्यांचे दर वाढले की, मालांचे दर वाढतात आणि एकूण महागाईत वाढ होते. त्यामुळे इंधनाच्या किमती नियंत्रणात राहाव्यात, अशी मागणी केली जाते.
महागाईचा ग्राहक किंमत निर्देशांक जो आकडा सांगतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात आपल्याला महागाईचा सामना करावा लागतो, अशी तक्रार काही ग्राहक करताना दिसतात. CPI अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्याची पद्धत आहे; त्यापेक्षा आपली मासिक खर्च करण्याची पद्धत वेगळी असू शकते. आपला मासिक खर्च करण्याचा पॅटर्न कसा आहे? आपल्या घरात लागणाऱ्या वस्तूंची निवड आपण कशी करतो?, यावरदेखील आपल्या खर्चात होणाऱ्या वाढीचे प्रमाण अवलंबून असते.
महागाईला तोंड देण्यासाठी आपल्यालाही खर्चावर नियंत्रण मिळवावे लागते. त्यासाठी पुढील उपाययोजना फायद्याच्या ठरू शकतील.
जमा-खर्चाच्या नोंदी
महागाईचा सामना करण्यासाठी, आपला खर्च किती अधिक प्रमाणात होतोय, हे कळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या मासिक जमाखर्चाच्या नोंदणी ठेवणं आणि बजेटिंगची (budgeting) सवय असणे आवश्यक आहे. या नोंदीच्या माध्यमातून आपला खर्च कसा होतो, याचा पॅटर्न आपल्या लक्षात येतो.
नियमित खर्चाची तुलना
महागाई आपल्यापुरती किती टक्के वाढली हे मोजण्याच्या पद्धती आहेत. यात अंदाज घेण्याची सर्वात सोपी पद्धत अशी की, एखाद्या महिन्यात गेल्या वर्षी झालेला खर्च, आणि त्याच महिन्यात झालेला खर्च यांची तुलना करून पाहता येते आणि त्याआधारे आपल्याला किती प्रमाणात महागाईला तोंड द्यावे लागले हे मोजता येऊ शकते. मात्र, या मोजदादीतही काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे असा मासिक खर्च मोजताना केवळ नियमित होणाराच खर्च मोजावा. काही वार्षिक - बहुवार्षिक खर्च असतात. उदाहरणार्थ, एखादे मोठे वाहन घेण्याचा किंवा जागेचा किंवा शिक्षणासाठी मोठी रक्कम एकदाच भरण्याचा खर्च किंवा आजारावर एकदाच झालेला मोठा खर्च असे वारंवार करावे न लागणारे खर्च यातून वजा करावेत. नियमित खर्चाची तुलना करून आपल्याला महागाई नेमकी किती वाढली याचा नेमका अंदाज बांधणे शक्य होऊ शकते.
बजेटिंगसाठी उपयोग
जमाखर्चाच्या नोंदींचा अजून एक मोठा उपयोग आहे. आगामी काळात स्वतःचा खर्च कोणत्या प्रकारे होणार आहे याचे बजेट आपल्याला तयार करता येते. दोन-तीन वर्षांत दर महिन्याला कसा खर्च झाला? याच्या नोंदी पाहून येत्या महिन्यात खर्च कसा करायचा आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्यानुसार खर्चासाठी तजवीज करता येते.
बजेटबाहेर खर्च टाळावा
महिन्याचे किंवा वर्षाचे बजेट तयार केल्यानंतर त्यात केलेल्या तरतुदींना धरून राहावे. एखाद्या गोष्टीसाठी ठरलेल्या खर्चापलीकडे खर्च करणे टाळावे, हेही आवश्यक आहे. बजेटनुसार खर्चाची सवय एकदम लागत नाही. मात्र, एकदा का बजेटनुसार आपण खर्च करू लागलो की, extra expenditure ला आपोआप आळा बसतो.
अशाप्रकारे, प्रत्येकाची गरज आणि सवयीनुसार यात बदल करून तुम्हीही तुमच्या खर्चावर सहज नियंत्रण आणू शकता. आपल्याला यात अधिक काटेकोर नियोजन करायचे असल्यास या विषयावरील पुस्तके, तज्ज्ञांचे लेख किंवा पर्सनल फायनान्स क्षेत्रातील सेवांची मदत घेऊ शकता.