केंद्र सरकारने नुकतीच इंधनांवरील करात (Tax) कपात केल्यानंतर राज्यातील सरकारनेही इंधनावरील मूल्यवर्धीत करात (VAT) कपात केली. राज्य सरकारने पेट्रोलवर 2.08 रूपये तर डिझेलच्या दरावरील करात 1.44 रूपये कपात केली. केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारनेही इंधनाच्या दरावरील टॅक्समध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2.08 आणि 1.44 रूपयांनी स्वस्त झाले आहे.
केंद्र सरकारने शनिवारी दि. 21 मे रोजी पेट्रोलवरील करात 8 रूपये तर डिझेलवरील करात 6 रूपयांची कपात केली होती. तसेच राज्य सरकारनेही आपापल्या उत्पादन शुल्कात कपात करावी, अशा सूचना सर्व राज्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केली आहे. राज्य सरकारच्या या इंधन कपातीच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 2 हजार 500 कोटींचा भार पडणार आहे.
Maharashtra government slashes the Value-added tax (VAT) on petrol by Rs 2.08 per litre and diesel by Rs 1.44 per litre: Maharashtra DGIPR
— ANI (@ANI) May 22, 2022
सर्वसामान्यांना नेमकं कोणत्या दराने इंधन मिळणार?
केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे राज्यात सर्वसामान्यांना पेट्रोल 11.58 रूपयांनी तर डिझेल 8.44 रूपयांनी स्वस्त मिळणार आहे.
इतर राज्यातील स्थिती काय आहे?
केंद्राच्या इंधनावरील कर कपातीनंतर इतर राज्यांनीही त्यांच्या टॅक्समध्ये कपात केली. केरळ सरकारने मूल्यवर्धीत करात (VAT) कपात करत पेट्रोलमध्ये 2.41 रूपये आणि डिझेलवरील 1.36 रुपये कर कपात केली. तर राजस्थान सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.48 रुपयांनी आणि डिझेलवरील 1.16 रुपयांनी कमी केले. या कर कपातीमुळे राजस्थानमध्ये पेट्रोल 10.48 रुपयांनी तर डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त होणार आहे. ओडिशा सरकारने पेट्रोलवरील कर 2.23 रूपये आणि डिझेलवरील कर 1.36 रुपयांनी कमी केले.
पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?
मुंबईत सोमवारी दि. 23 मे रोजी पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रूपये आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रूपये तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 92.24 रूपये इतका झाला आहे.