Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कसे बनवावे घरासाठी मासिक बजेट?

कसे बनवावे घरासाठी मासिक बजेट?

अशाप्रकारे तयार करा मासिक बजेट आणि खरेदी करा तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू

आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे असे आपल्याला सतत वाटत असते. पण अनेक वेळा ती वस्तू प्रचंड महाग असते. इतके सारे पैसे आपल्याकडे नसल्याने आपल्याला आपली आवडती गोष्ट घेता येत नाही. त्यावेळी आपल्याला प्रचंड वाईट वाटते. पण एखाद्या महिन्यात आपण खूप चांगले आर्थिक नियोजन केले आणि मला ठरावीक रक्कम वाचवायचीच आहे असे मनाशी ठरवले तर तुम्ही तुमची आवडती गोष्ट तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता.              

तुम्ही एखाद्या महिन्यात कधी प्रयत्न करून पाहिला आहे की, मला जितक्या वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे, तितक्याच वस्तू मी खरेदी करणार... अतिरिक्त कोणताही खर्च करणार नाही. तसेच घरचे जेवण जेवण्याचा प्रयत्न करणार, हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करणार, रिक्षा-टॅक्सीचा वापर न करता बस, रेल्वेने प्रवास करणार... तुम्ही असं करू शकलात तर तुम्ही खूप सारे पैसे वाचवू शकता. खरं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही विचार करत आहात त्याहीपेक्षा अधिक पैशांची बचत होऊ शकते. त्यासाठी केवळ काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत.              

खर्च का होतोय याचा अभ्यास करणे         

आपण कोणत्या गोष्टीवर सगळ्यात जास्त खर्च करत आहोत याचा अभ्यास करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. एवढेच नव्हे तर काही वेळा मुड खराब असल्याने एखादी व्यक्ती जास्तीत जास्त खर्च करते असे म्हटले जाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही जणांना शॉपिंग केल्याने आनंद मिळतो आणि त्याचमुळे ते शॉपिंगवर खूप सारा पैसा कधी खर्च करतात हेच त्यांना कळत नाही. कधी कधी आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे देखील आपला खर्च जास्त होतो. उदाहरणार्थ, आपली मित्रमंडळी जास्त शॉपिंग करणारी असली तर आपण देखील त्यांच्यासोबत अनावश्यक शॉपिंग करायला लागतो. त्यामुळे आपली मित्रमंडळी शॉपिंग करतात. म्हणून आपण देखील शॉपिंग करण्याची काहीही गरज नाहीये.               

राहाणीमान         

 आजकाल आपले राहाणीमान खूपच बदलले आहे. हॉटेलमध्ये खाणे, पार्ट्या करणे याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच ऑफिसमध्ये इतरांइतके आपण देखील स्टायलिश दिसावे यासाठी प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे अनेकजण महिन्याला खूप सारे शॉपिग करतात. पण आपण या सगळ्या गोष्टींवर महिन्याभरात किती पैसे खर्च करायचे हे ठरवणे गरजेचे आहे आणि तितकेच पैसे आपण खर्च करत आहोत की नाही हे तपासणे देखील गरजेचे आहे. महागडे कपडे, उच्च राहाणीमान, महागड्या गोष्टींवर आपण पाण्यासारखा पैसा खर्च करत नाही आहोत ना हे तपासणे आवश्यक आहे.              

खर्चावर नियंत्रण            

 आपण एखादा छोटासाच खर्च करतोय असे आपल्याला वाटत असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण महिन्याभरात असे छोटे छोटे खर्च करत आपण खूप सारा पैसा खर्च केलेला असतो हेच आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण दिवसाला किती खर्च करतो याची नोंद करून ठेवा. तुम्ही किती खर्च करत आहात याविषयी नोंद ठेवत असाल तरच तुम्ही तुमचा खर्च नियंत्रणात आणू शकता.