गिग इकॉनॉमी (GIG Economy) म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योगात तुम्ही वैयक्तिक देत असलेली सेवा आणि त्यासाठी तुम्हाला मिळणार मोबदला. अर्थात, तुमचं काम कायमस्वरुपी नसतं. आणि तुम्ही जे काम करता त्याचा मोबदला ठरलेल्या वेळेला तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात गायक आणि वादक जसे कार्यक्रमासाठी एकत्र येतात. आणि त्या कार्यक्रमाचा मोबदला त्यांना मिळतो किंवा बिदागी मिळते तसा हा प्रकार आहे. स्विगी, झोमॅटो आणि इतर असंख्य ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सामान घरपोच पोहोचवणारी मुलं, ओला-उबर कंपन्यांसाठी टॅक्सी चालवणारे तरुण हे गिग वर्कर्स आहेत. आणि अशा कंपन्या गिग कंपन्या. मुख्यत्वे सेवा क्षेत्रात मोडणाऱ्या या कंपन्या आणि तिथं काम करणाऱ्या कंत्राटी लोकांची मिळून बनलीय गिग अर्थव्यवस्था.
हा उद्योग सेवा उद्योग असल्यामुळे कोव्हिडच्या काळातही अशी अर्थव्यवस्था तेजीत होती. आणि आता एका संशोधन अहवालानुसार, येत्या तीन वर्षांत अशा उद्योगांमधून 90 - 110 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रगत देशांप्रमाणे भारतातही तरुणांचा ओढा गिग कंपन्यांकडे वळत आहे. कारण, आपल्या मर्जीप्रमाणे इथं काम करता येतं. आणि केलेल्या कामाचा अनेकदा ताबडतोब मोबदला मिळतो. दुसरी एखादी नोकरी चालू ठेवून अतिरिक्त पैशासाठीही इथं काम करता येतं.
भारतातील अग्रगण्य गिग कंपन्यांच्या प्रमुखांशी बोलून त्यांना कुठल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची गरज आहे याचा एक अहवाल अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि त्यातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. अर्थातच, हा रोजगार मुख्यत्वे फ्री लान्स किंवा स्वतंत्रपणे काम करण्यासाठी असेल.
अॅपवर आधारित सेवा देणाऱ्या कंपन्या वाढत आहेत. वस्तूंची घरपोच सेवा तसंच ग्राहक हितसेवा देणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या दिवसांत डिलिव्हरी बॉय तसंच घरी जाऊन एखादी सेवा देणारे तरुण लागणार आहेत.
पर्सनल केअर, अॅपवर बुकिंग केल्यावर घरी जाऊन क्लिनिंग सेवा देणं, वाहन दुरुस्ती, अन्न व इतर सामान घरपोच पोहोचवणे, टॅक्सी सेवा, मनुष्यबळ विकास सेवेचं कन्सल्टिंग, किरकोळ सामानाचा पुरवठा, घरी आणि ऑफिसमध्ये लागणाऱ्या अनेक सेवा अशा सगळ्याच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मनुष्यबळाची गरज लागेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्याही आपल्या सेवा घरपोच पोहोचवण्यासाठी अॅप किंवा इतर तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत.
गिग कंपन्यांमध्ये भारतात सर्वाधिक मागणी 22% अन्न घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. तर वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयजसाठीची मागणी 26% आहे. घरांची देखभाल, गृहोपयोगी वस्तूंची दुरुस्ती या श्रेत्रात गिग कर्मचाऱ्यांची गरज 16% आहे. क्लिनिंग म्हणजे व्यावसायिक सफाईसाठी कर्मचाऱ्यांची असलेली गरज 10% आहे. तर पर्सनल केअर म्हणजे लहान मुलं, आजारी किंवा वृद्धांना सांभाळण्याची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज 7% आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अशा नोकऱ्या कुठे आणि कशा मिळवायच्या हे माहीत नसल्यामुळे 62% लोकांना त्या करता येत नाहीत. तसंच 32% लोकांचं इंग्रजी कच्चं आहे. तर 10% लोकांना स्थानिक भाषा कळत नसल्यामुळे या नोकऱ्या मिळू शकत नाहीत.