जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची चिन्हे आता अधिक गडद होताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या परदेशी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे घटलेली गुंतवणूक आणि वाढता खर्च. या दोन्हींचा मेळ बसवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, गुगल आदी कंपन्यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारलेला दिसतो आहे.
याच पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने गेल्या आठवड्यात 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या 10,000 नोकऱ्यांच्या कपाती व्यतिरिक्त ही नव्याने केली गेलेली नोकरकपात आहेत. जानेवारी 2023 मध्ये Microsoft ने, यंदाच्या आर्थिक वर्षात जगभरातील कार्यालयातील 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल असे जाहीर करण्यात आले होते. दिग्गज टेक कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे.
या विभागांना सर्वाधिक फटका
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, ताज्या नोकऱ्या कपातीचा सर्वाधिक परिणाम विक्री आणि ग्राहक सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. याशिवाय अभियांत्रिकी आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. जगभरातील मायक्रोसॉफ्टचा व्यापार घटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मायक्रोसॉफ्टने ‘डिजिटल सेल्स अँड सक्सेस’ (Digital Sales and Success) हा विभाग बंद केला आहे. हा विभाग मुख्यत्वे ऑनलाईन विक्रीसाठी कार्यरत होता. उत्पादनांची ऑनलाइन विक्री आणि ग्राहकांच्या समस्या हाताळण्याचे काम या विभागाकडे होते. कंपनीने कस्टमर सोल्युशन्स मॅनेजरची भूमिका देखील काढून टाकली आहे आणि काही कर्मचाऱ्यांना कस्टमर सक्सेस अकाउंट मॅनेजमेंटमध्ये हलवले आहे. मायक्रोसॉफ्ट या विभागात Artificial Intelligence चा वापर करणार असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.