Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JFSL share Listing: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार

Jio Financial listing date

Image Source : www.jagranjosh.com/ hindubabynames.info

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार आहे. या शेअरच्या किंमतीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. बिगर बँकिंग वित्त सेवा क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे लहान कंपन्यांना धडकी भरली आहे.

JFSL share Listing date: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (JFSL) ही कंपनी नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडपासून विभक्त झाली. म्हणजेच JFSL ही नवी कंपनी अस्तित्वात आली असून 21 ऑगस्टला कंपनीचा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

JFSL चा शेअर 21 ऑगस्टला सूचीबद्ध होणार 

शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होताच शेअरची प्रगती कशी राहील, याची गुंतवणुकादारांना उत्सुकता लागली आहे. मागील आठवड्यात 1:1 या प्रमाणात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पात्र समभागधारकांना शेअरचे वाटप करण्यात आले. उदाहरणार्थ, ज्या समभागधारकांकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे 100 शेअर्स होते त्यांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे आणखी 100 शेअर्स मिळाले. 20 जुलैच्या रेकॉर्ड डेट नुसार शेअरचे वाटप झाले. 

मागील महिन्यात प्री-लिस्टिंग स्पेशल सेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका शेअरची किंमत 261.85 रुपये पुढे आली होती. मात्र, आघाडीच्या ब्रोकरेज संस्थांनी 190 रुपये शेअरची किंमत राहील असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भांडवली बाजारात शेअर सूचीबद्ध झाल्यावर काय होतेय, याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. 

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल 1.66 लाख कोटी इतके आहे. (Jio Financial listing date) या मुल्यांकनानुसार बिगर बँकिग वित्त संस्था कंपन्यांमध्ये जिओ फायनान्शिअल ही दुसरी मोठी कंपनी ठरली आहे. 

सध्या JFSL कंपनीचा  निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, बाजारात सूचीबद्ध होईपर्यंत शेअरची किंमत तेवढीच राहील. सध्या जिओ JFSL चे 45.80% शेअर्सची मालकी प्रमोटर्सकडे आहे. तर 6.27% म्युच्युअल फंडस् आणि 26.44% मालकी परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडे आहे. 

बिगर बँकिंग वित्त क्षेत्रात जिओची एंट्री

डिजिटल बँकिंग देशात वाढत असताना नव्या व्यवसायाची संधी ओळखून जिओने बाजारात उडी घेतली आहे. इन्शुरन्स, कर्ज, मालमत्ता व्यवस्थापन, डिजिटल लोन, म्युच्युअल फंड वितरणासह इतरही वित्त सेवा कंपनीकडून दिल्या जातील. सध्या बिगर बँकिंग क्षेत्रात लहान कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र, जिओ सारखा मोठा प्लेअर मार्केटमध्ये आल्यामुळे वित्तसेवा देणाऱ्या लहान कंपन्यांना धडकी भरली आहे.