Jio Financial: देशात किरकोळ आणि व्यावसायिक कर्ज देण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: फिनटेक कंपन्यांकडून डिजिटल पद्धतीने कर्ज देण्याचा प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पावसाळ्यात जसे भूछत्र उगवतात तशा फिनटेक कंपन्या बाजारात आल्या आहेत. ही संधी रिलायन्स उद्योगाला खुणावत असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठा निर्णय घेतला. येत्या काळात कंपनी फिनटेक क्षेत्रात उडी घेणार असून ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे.
शेअर बाजारात जिओ फायनान्स नव्याने सूचीबद्ध
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी आतापर्यंत जिओ इंडस्ट्रीजचा एक भाग होती. मात्र, आता रिलायन्सने विलगीकरण करून जिओ फायनान्शिअल एक वेगळी स्थापन केली आहे. ही कंपनी लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. या प्रक्रियेस 'डिमर्जर' असे म्हटले जाते. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर ही कंपनी सूचीबद्ध होईल. निफ्टी-50 आणि निफ्टी-100 इंडेक्समध्येही कंपनीचा समावेश होईल.
स्टार्टअप कंपन्यांचा व्यवसाय जिओ खाणार
किरकोळ ग्राहक आणि लहान उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी जिओ फिनटेक क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. मात्र, या निर्णयामुळे आधीच डिजिटल कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे. कारण, जिओ टेलिकम्युनिकेशन, रिटेल, मीडियायासह इतरही शेकडो व्यवसायांतून ग्राहकांचा डेटा उपलब्ध आहे. या डेटाचा वापर करून जिओ ग्राहकांना ऑनलाइन कर्जपुरवठा करेल. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या स्टार्टअप कंपन्यांचा व्यवसायातील वाटा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती वाटत आहे.
आजपासून शेअर ट्रेडिंग सुरू
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरची किंमत सकाळी 10 वाजता ठरेल. त्याआधी नियमानुसार स्पेशल ओपनिंग सेशन घेतले जाईल. ज्यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आहेत त्यांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा एक वेगळा शेअर मिळेल.
फिनटेक क्षेत्रात होणार उलथापालथ
B2B आणि B2C अशा दोन्ही व्यवसायांवर रिलायन्सची विविध उद्योगांद्वारे पकड आहे. त्यामुळे इतर फिनटेक कंपन्यांपेक्षा जिओ फायानान्शिअल सर्व्हिसेस कंपनीला ग्राहकांपर्यंत सहज पोहचता येईल. त्यामुळे छोट्या फिनटेक कंपन्यांच्या व्यवसायाचा वाटा जिओच्या पदरात पडण्याची शक्यता जास्त आहे.
ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्या सध्या बाजारात आहेत. जिओमुळे स्पर्धा निर्माण झाली तर यातील अनेक कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. टेलिकॉम क्षेत्रात जिओने जशी मक्तेदारी निर्माण केली. तशी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये जिओ धुमाकूळ घालणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात डिमर्जर करणार असल्याचे रिलायन्सने जाहीर केले होते. आज ही प्रक्रिया पूर्ण झाली.