इंडिया एनर्जी वीक दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी E-20 पेट्रोलची विक्री सुरू केली. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा हा कार्यक्रम आहे. मात्र, त्यांनी ती तीनही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांसाठी सुरू केली. पण त्यापाठोपाठ खाजगी क्षेत्रातील कंपनी जिओ-बीपीने (Jio-BP) 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याची घोषणा केली. जिओ-बीपी हा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम आहे.
कोणत्या शहरात हे पेट्रोल मिळेल?
जिओ-बीपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या कंपनीने E20 पेट्रोल देखील बाजारात लॉन्च केले आहे. नावाप्रमाणेच E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले आहे. 20% इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात आणणारी जिओ-बीपी ही देशातील पहिली खाजगी कंपनी आहे. ते म्हणतात की जिओ-बीपीच्या प्रमुख शहरांमध्ये असलेल्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल उपलब्ध असेल. यामध्ये मुंबई, दिल्ली या महानगरांचाही समावेश आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की लवकरच ते जिओ-बीपीच्या सर्व पंपांवर उपलब्ध होईल.
सरकारचे नियोजन
नरेंद्र मोदी सरकार देशातील कच्च्या तेलाचे बिल कमी करण्यात गुंतले आहे. या क्रमाने, केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षा, कमी कार्बन उत्सर्जन, उत्तम हवेचा दर्जा, आत्मनिर्भरता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. जिओ-बीपीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार E20 पेट्रोलची विक्री सुरू केल्याचे म्हटले आहे.
वेगाने वाढणारी बाजारपेठ
भारतातील इंधन आणि मोबिलिटी मार्केट झपाट्याने वाढत आहे. पुढील 20 वर्षांसाठी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी इंधन बाजारपेठ असेल अशी अपेक्षा आहे. जिओ-बीपीचे म्हणणे आहे की त्यांची मोबिलिटी स्टेशन ही वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यासोबतच ती सरकारच्या योजनांनाही ठोस स्वरूप देत आहे.