Japan Airlines: कुठेही प्रवास करायचा असेल तर बॅगमधील कपड्यांनी सर्वाधिक जागा व्यापलेली असते. पर्यटनासाठी किंवा व्यावसायिक कामासाठी जास्त असाल तर जड सामान सांभाळण्याची वेळ येते. मात्र, आता जपान एअरलाइन्सने प्रवाशांच्या बॅगचे वजन कमी करण्यासाठी अफलातून संकल्पना राबवली आहे. ही एअरलाइन्स जपानला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाड्याने कपडे देण्याची सुविधा सुरू करणार आहे.
विमान प्रवासावेळी तुम्ही 8 ड्रेस भाड्याने बुक करू शकता. ही सेवा खास जपानमध्ये पर्यटन, व्यवसाय किंवा इतर कारणासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. जपान एअरलाइन्स आणि सुमितोमो कोर्पोरेशन या कंपन्यांनी मिळून ही सेवा सुरू केली आहे. बिझनेस लाइन वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
विमान कंपनीच्या संकेतस्थळावरुन प्रवाशांना त्यांच्या मापाचे कपडे आवडीनुसार निवडता येतील. तसेच वेगवेगळ्या ऋतुसाठी आणि गरजेनुसार कपडे निवडता येतील. (Japan airline rental clothes) जर तुम्ही पर्यटनासाठी जात असाल तर कॅज्युअल कपडे निवडू शकता तर बिझनेसच्या कामासाठी जात असाल तर फॉरमल कपडेही मिळतील. जपान एअरलाइन्स ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करत आहे.
कपड्यांचे भाडे किती?
एक ड्रेसची किंमत 28 ते 49 डॉलरच्या दरम्यान असेल. तसेच जास्तीत जास्त 8 ड्रेस भाड्याने घेता येतील. दोन आठवड्यापर्यंत तुम्ही कपडे घेऊ शकता. (Japan airline rental clothes) अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच एका एअरलाइन्सने केला आहे. यास चांगला प्रतिसाद मिळाल्यास कंपनी या सेवेचा विस्तार करणार आहे.
जपानमधील कोरोनामुळे लागू असलेले सर्व निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात जगभरातील 19 लाख पर्यटकांनी जपानला भेट दिली.
विमानातील सामानाचे वजन कमी होणार
नागरिकांचे सामान कमी झाल्यामुळे विमानाचे वजनही कमी होईल. यातून इंधनाची बचत होईल, असा दावा जपान एअरलाइन्सने केला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा प्रयोग सुरू केल्याचे कंपनीने म्हटले आहे. विमान प्रवासामुळे किती कार्बन उत्सर्जन कमी झाले याची माहिती एअरलाइन्स प्रवाशांनाही देणार आहे.