20 हजार कोटी रुपये इतकी मोठी रक्कम या FPO द्वारे उभारली जाणार होती. मात्र तो रद्द करावा लागला आहे. अशा स्थितीत आता अदानी ग्रुपची पुढची रणनीती काय असेल याविषयी जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. गौतम अदानी यांनीच यावर भाष्य केले आहे आणि समूह या सगळ्याकडे कसे पाहतो आहे आणि पुढची वाटचाल कशी असेल ते स्पष्ट केले आहे.
‘’माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित सर्वात महत्त्वाचं’’ अस अदानी FPO रद्द करताना म्हणाले आहेत तसेच “गेल्या 40 वर्षांच्या आमच्या प्रवासात मला सर्वच भागधारकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. विशेषत: गुंतवणूकदारांनी मला पाठिंबा दिला आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आहे. माझ्या यशासाठी तेच कारणीभूत आहेत.माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचं हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. बाकी सर्वकाही दुय्यम आहे. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आपण FPOमागे घेतला आहे”, असं अदानी यांनी स्पष्ट केले होते.
कर्ज चुकवण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला
सध्या शेअर बाजारात मोठ्या उलथापालथी दिसून येत आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळत आहे. कंपनीचं पुढे काय होणार, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यावर अदानी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा निर्णय आमच्या सध्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम करणार नाही. आम्ही यापुढेही प्रकल्पांवर वेळेत अंमलबजावणी सुरू करून ते पूर्ण करत राहणार आहोत. आमच्या कंपनीचे मूलभूत तत्व खूप मजबूत आहेत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य देखील कायम आहे. कर्ज चुकवण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे”, असं त्यांनी सांगितल आहे. “आम्ही यापुढेही दीर्घकाळ संपत्ती तयार करणे आणि विकासावर फोकस करत राहणार आहोत. एकदा शेअर बाजार स्थिर झाला की आम्ही आमच्या निर्णयांचा पुनर्विचार करणार आहोत. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदार पद्धतीने संपत्ती बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितले आहे.