Salesforce Layoffs: सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत कंपनी काही ऑफिसेस बंद करणार आहे. तसेच कंपनीने आपल्या खर्चात कपात करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी Accenture या आयटी कंपनीनेसुद्धा व्यवसायात आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्याचा विचार केला होता. एकूण जगभर सुरू असलेल्या मंदीच्या वातावरणामुळे भारतातील कंपन्यांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
Salesforce चे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सध्याची परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे. कंपनीचे क्लायंट खर्चाशी संबंधित निर्णयावर खूपच विचार करत आहे. कोरोना काळात आपल्या कंपनीने चांगला महसूल मिळवला होता. त्यामुळे आपण त्या काळात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली. ज्याचा आर्थिक बोजा आता कंपनीवर पडू लागला आहे. त्यामुळे आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. तसेच या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, असेही बेनिऑफ यांनी म्हटले.
फेसबुक आणि अमेझॉनने गेल्या काही महिन्यांमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यामुळे मोठे निर्णय घेतले होते. त्यात कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय सुद्धा होता. सध्या आयटी कंपन्यांमध्ये याची हवा सुरू झाली आहे. त्यात महागाई सतत वाढत आहे. जगभरातील बॅंका ही वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरात वाढ करत आहे. पण यामुळे सर्वसामान्य ग्राहक किंवा नोकरदार वर्गावर दोन्ही बाजुंनी संकट आले आहे. नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच महागाईसुद्धा वाढत आहे आणि लोकांकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत.
वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, पेप्सिको कंपनीसुद्धा 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जागतिक पातळीवरील कंपन्यांमधील ट्रेंड पाहता आणखी काही कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्याची शक्यता दिसते.