• 07 Dec, 2022 09:58

IPO Update : आयपीओमध्ये गुंतवणुकीची धमाकेदार संधी! पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ येणार!

IPO Update

IPO Update : पुढील आठवड्यात DCX system Limited, Global Health Limited, Bikaji Foods International आणि Fusion Micro Finance Limited या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

पुढील आठवड्यात आयपीओ मार्केटमध्ये आणखी 4 आयपीओ (Initial Public Offering - IPO) दाखल होत आहेत. आयपीओच्या माध्यमातून 4 कंपन्या 4,500 कोटींचा निधी उभारणार आहेत. यामध्ये DCX system Limited, Global Health Limited, Bikaji Foods International आणि Fusion Micro Finance Limited या कंपन्या आयपीओ सादर करणार आहेत.

[media url="https://www.youtube.com/watch?v=Pg7EJc18dUc"][/media]


विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात येणारे हे चार नवीन आयपीओ धमाका करतील. कारण या आयपीओंना मिळालेल्या प्रतिसादावरून आणखी काही कंपन्या आयपीओ आणण्यास तयार आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्च हेड दीपक जसानी (Deepak Jasani, Retail Research Head, HDFC) यांनी सांगितले की, “तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुढील आठवड्यात आयपीओ मार्केटमध्ये आनंदाचे वातावरण दिसेल. सेकंडरी मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वीच लिस्ट झालेल्या कंपन्यांच्या शेअर्स मधून गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली. तरीसुद्धा नवीन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना शेअर्सच्या किंमती बघायला आवडतील.” 

गेल्या वर्षी आयपीओद्वारे कंपन्यांनी विक्रमी निधी उभारला. यंदा आयपीओ मार्केट थंडावले आहे. पहिल्या तीन महिन्यांत केवळ तीन कंपन्यांनी आयपीओ दिले आहेत. मार्चपासून जवळपास 19 कंपन्यांनी आयपीओद्वारे पैसे उभे केले आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपन्यांनी आयपीओद्वारे एकूण 44,085 कोटी रुपये उभे केले आहेत. तर 2021 मध्ये कंपन्यांनी आयपीओद्वारे 1.19 लाख कोटी रुपये उभे केले होते. 

आयपीओ मार्केट काही काळ थंड राहण्याचे कारण म्हणजे सेकंडरी मार्केटमधील चढ-उतार होय. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करत राहील, असे मानण्यात येत आहे. युक्रेन-रशिया संघर्ष, युरोपातील ऊर्जा संकट आणि मंदीची भीती याचाही परिणाम शेअर बाजारातील भावावर होत आहे. जागतिक स्तरावर ही मोठी आव्हाने दिसत असली तरी भारतीय बाजारावर त्यांचा फारसा परिणाम होणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या वर्षी भारतीय शेअर बाजारांची कामगिरी जगातील बहुतांश शेअर बाजारांपेक्षा चांगली राहिली आहे. आतापर्यंत या वर्षी सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा 2-2 टक्के राहिला आहे. त्या तुलनेत Dow Jones मध्ये 13 टक्के, Hang Seng मध्ये 27 टक्के, Kospi मध्ये 26 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. 

डीसीएक्स सिस्टिम लिमिटेड (DCX system Limited)

DCX system Limited ही एक विद्युत तारांची निर्माता कंपनी आहे. 31 ऑक्टोबर 2022 पासून या कंपनीचा आयपीओ सादर होत आहे. 2 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणाऱ्या शेअर विक्रीतून 500 कोटी रुपयांचे भांडवल उभारले जावे असे कंपनीला वाटते. कंपनीकडून 400 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीचे समभाग 11 नोव्हेंबर रोजी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.

ग्लोबल हेल्थ लिमिटेड (Global Health Limited)

ग्लोबल हेल्थ लिमिटेड जी मेदांता नाममुद्रे अंतर्गत रुग्णालये चालवून आरोग्य सेवा पुरवते. Global Health Limited चा आयपीओ 3 नोव्हेंबर रोजी सादर होत आहे. 319 रुपये ते 336 रूपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला असून गुंतवणूकदारांना कमीत कमी 44 समभाग आणि त्यापुढे 44 च्या पटीत समभागांची (शेअर्सची) खरेदी करता येणार आहे.

बिकाजी फुड्स इंटरनॅशनल (Bikaji Foods International)

या कंपनीला आयपीओ विक्रींच्या माध्यमातून 900 कोटी रुपयांचा निधी उभारायचा आहे. ही कंपनी विद्यमान शेअर होल्डर आणि प्रवर्तक आयपीओच्या माध्यमातून 2.93 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. ही विक्री 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान खुली होणार आहेत.

फ्युजन मायक्रो फायनान्स लिमिटेड (Fusion Micro Finance Limited)

या कंपनीची शेअर विक्री 2 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. गुंतवणूकदार 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. कंपनीकडून प्रती शेअर 350 रुपये ते 368 रुपये किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.