• 28 Nov, 2022 17:27

iPhone Production Hit : फॉक्सकॉनचा चीनमधील प्रकल्प बंद! iPhone उत्पादनाला फटका बसणार ,हे आहे कारण...

Foxconn , iPhone

Image Source : https://www.rediff.com

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात चर्चेत आलेली फॉक्सकॉन कंपनी चीनमध्ये मात्र नव्या संकटात सापडली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. झेंग्झोऊ प्रांतात लॉकडाउनमुळे फॉक्सकॉनला प्रकल्प बंद करावा लागला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात iPhone उत्पादनात 30% घसरण होण्याची शक्यता आहे.

नजीकच्या काळात बाजारात आयफोनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. (iPhone Production Hit due to Lockdown) आयफोन उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीला चीनमधील प्रकल्प बंद करावा लागला आहे. चीनमध्ये कोरोना साथ पुन्हा पसरली असून तेथील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. फॉक्सकॉन ही अॅपल कंपनीसाठी आयफोनची निर्मिती करते. जगभरात तयार होणाऱ्या एकूण आयफोनपैकी 70% आयफोन फॉक्सकॉनकडून तयार केले जातात.

फॉक्सकॉनचा चीनमधील बड्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या झेंग्झोऊ प्रांतातील प्लान्ट कंपनीला लॉकडाउनमुळे बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 30% उत्पादन घटण्याची भीती आहे. ज्याचा फटका आयफोनच्या जगभरातील पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी झेंग्झोऊ प्रांतात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ज्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. मागील आठवडाभरापासून इथली परिस्थिती बिकट बनली आहे. इथल्या बड्या कंपन्यांनी कारखाने बंद ठेवले असून कामगार आपल्या गावी परतले आहेत.

फॉक्सकॉनचा झेंग्झोऊ प्रांतातील प्रकल्पात तब्बल दोन लाख कामगार काम करतात. चीनमधील ही एक मोठी आयफोन  उत्पादन करणारी फॅक्टरी आहे. उत्पादन ठप्प झाल्याने   येत्या सुटीच्या हंगामात आयफोनचा पुरवठा कोलमडू शकतो. ज्याचा मोठा आर्थिक फटका अॅपलला बसण्याची शक्यता आहे.

कामगार घरी परतू लागले

झेंग्झोऊ प्रांतात कोरोनाचे कठोर निर्बंध लागू केले आहेत. कंपन्या बंद झाल्याने कामगारांची कोंडी झाली आहे. 
फॉक्सकॉनच्या प्रकल्पातून देखील हजारो कामगारांनी घरची वाट धरली आहे. लॉकडाउनमध्ये कंपनीकडून निकृष्ट दर्जाची सुविधा पुरवल्याने नाराज झालेले हजारो कामगार घरी निघून गेले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. परिणामी फॉक्सकॉनला फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्पादनातील घट भरुन काढण्यासाठी फॉक्सकॉनचा आटापिटा

फॉक्सकॉनची झेंग्झोऊ प्रांतातील ही फॅक्टरी चीनमधील ही एक मोठी आयफोन उत्पादन करणारा प्लान्ट म्हणून ओळखला जातो. इथ लॉकडाउनमुळे प्लान्ट बंद करण्यात आला आहे. यामुळे जवळपास एक तृतीयांश किंवा त्याहून अधिक प्रमाणात उत्पादनात घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादनातील घट भरुन काढण्यासाठी फॉक्सकॉनने इतर प्लान्टमधील उत्पादन क्षमता वाढवली आहे. शेनझेन शहरातील प्रकल्पातून आयफोन निर्मिती वाढवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात चर्चेत आली होती फॉक्सकॉन

इलेक्ट्रॉनिक चीप, सेमी कंडक्टर निर्मितीमधील जगातील आघाडीची कंपनी अशी ओळख असलेली फॉक्सकॉन महाराष्ट्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती. फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन कंपन्यांनी महाराष्ट्रात सेमी कंडक्टर चीप तयार करण्याचा प्रकल्प रद्द केला होता. हा प्रकल्प महाराष्ट्रा ऐवजी गुजरातमध्ये हलण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांकडून घेण्यात आला होता. प्रकल्पात वेदांता-फॉक्सकॉनकडून 1.54 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार होती. कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून स्वस्त दरात जमीन आणि इतर कर सवलती ऑफर करण्या आल्या होत्या. मात्र वेदांता फॉक्सकॉन शेजारच्या गुजरात राज्यात प्रकल्प हलवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते.