निवृत्तीनंतरचा काळ म्हणजे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा काळ. यात सरकारी नोकरी करणाऱ्यांना पेन्शन (Pension) मिळते. तर खासगी कर्मचाऱ्यांना विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून परतावा मिळू शकतो. ज्यांनी आधीच योजना सुरू केलेल्या असतात, त्यांना नियमित उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत उपलब्ध असतो. हा खात्रीशीर स्त्रोत आपलं आयुष्य सुकर करत असतो. त्यामुळे उत्पन्नाची खात्री असणाऱ्या, योग्य परतावा देणाऱ्या योजना कोणत्या याची माहिती असायला हवी. त्यासाठी काही योजना आम्ही आपल्याला सांगत आहोत.
Table of contents [Show]
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
सरकारी योजनेतली दुसरी चांगला परतावा देणारी योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen's Savings Scheme) होय. यात नियमित उत्पन्न आणि कर लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 1,000 रुपये आणि कमाल 30 लाख रुपये गुंतवणं गरजेचं आहे. हे खातं 60 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाची कोणतीही व्यक्ती किंवा जोडीदार संयुक्तपणे उघडू शकतं. संरक्षण सेवेतल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी ते 55 वर्ष वयाचे झाल्यानंतर हे खातं उघडू शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या (SCSS) खात्यात ठेवी करून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर कपातीचा दावाही या माध्यमातून करता येवू शकतो. या योजनेतलं व्याज तिमाही आधारावर देय आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतलं (Post Office Monthly Income Scheme) खातं कमीत कमी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये ठेवीसह उघडता येतं. संयुक्त खात्यांसाठी जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येवू शकतात. या यजनेचा मॅच्युरिटी कालावधी खातं उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षे असतो. दर महिन्याला 7.4 टक्के दरानं व्याज दिलं जातं.
अटल पेन्शन योजना (APY)
निवृ्त्तीनंतर स्थिर उत्पन्न देणारी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)ही एक सरकारी सामाजिक सुरक्षा योजना आहे. वय वर्ष 18 ते 40 या गटातल्या बँक खातं असणारी व्यक्ती या योजनेची सदस्य होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून सदस्यांना किमान 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पेन्शन मिळते.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) ही निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न देऊ शकणारी अशी योजना आहे. या योजनेत सहभागी प्रत्येक सदस्याला एक यूनिक परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) दिला जातो. या योजनेअंतर्गत टियर 1 आणि टियर 2 अशी दोन प्रकारची खाती तुम्हाला उघडता येवू शकतात. टियर 1 खात्यात तुम्हाला किमान 500 रुपये आणि टियर 2 खातं उघडल्यास 1,000 रुपये द्यावे लागतात. टियर 1 खात्यामधल्या रकमेसाठी तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80CCD याअंतर्गत टियर 1मधल्या कपातीचा दावा करू शकता. मात्र टियर 2 खात्यामध्ये असा कोणताही लाभ मात्र तुम्हाला मिळत नाही.
युनिट लिंक्ड विमा योजना (ULIP)
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन योजना (Unit Linked Insurance Plan) ही विमा आणि गुंतवणूक असे दोन्हीचे फायदे देते. त्यामुळे निवृत्तीनंतरची ही एक आदर्श अशी योजना गृहीत धरण्यास हरकत नाही. या योजनेनुसार पॉलिसीधारक लाइफ इन्शुरन्स कव्हरेजसाठी प्रीमियम म्हणून काही रक्कम भरतो तर उर्वरित रक्कम डेब्ट फंड, इक्विटी फंड किंवा बॅलन्स्ड फंडांमध्ये गुंतवली जात असते.