Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Mantra: श्रीमंत व्हायचं असेल तर गुंतवणूक करताना 'या' 7 गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका 

Investment tips

अनेकजण पैसे बचत खात्यामध्ये किंवा घरामध्ये कॅशच्या स्वरुपात ठेवतात. असे केल्यास दीर्घकाळात संपत्ती निर्माण करता येणार नाही. देशातील फक्त पाच ते सहा टक्के नागरिक इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात. महागाईचा सरासरी दर 6% आहे. अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी, ज्यातून महागाईवर मात करत येईल. फक्त बचत खात्यात पैसे ठेवून महागाईवर मात करता येणार नाही. श्रीमंत व्हायचं असेल तर लेखातील गुंतवणूक टिप्स वाचा.

Investment Mantra:    शाळा महाविद्यालयांमध्ये आपल्याला गणिताचे मूलभूत नियम शिकवले जातात. मात्र , गुंतवणुकीचे मंत्र शाळेमध्ये शिकवले जात नाहीत. मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक अद्यापही पैसे बचत खात्यामध्ये किंवा घरामध्ये कॅशच्या स्वरुपात ठेवतात. त्यामुळे दीर्घकाळात ते संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. देशातील फक्त पाच ते सहा टक्के नागरिक इक्विटी बाजारात गुंतवणूक करतात. महागाईचा सरासरी दर  6% आहे. त्यामुळे तुम्ही अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी , जेथे महागाईचा दर विचारात घेतला जाईल. बचत खात्यातून ते शक्य होणार नाही. कारण , बचत खात्यात पैसे ठेवत असाल तर तुमच्या पैशांचे मूल्य दिवसागणिक कमी होत जाईल. 

आता भांडवली बाजार , म्युच्युअल फंड योजना आणि इतरही डिजिटल गुंतवणुकीच्या पर्यायात पैसे गुंतवणे सोपे झाले आहे. अनेक फिनटेक कंपन्यांचे अॅप्स बाजारात उपलब्ध आहे. ( Things to remember while Investing) घरबसल्या तुम्ही हव्या त्या पर्यायात गुंतवणूक करू शकता. त्यासाठीचे ज्ञानही तुम्हाला घरबसल्या मिळू शकते. मात्र , बाजारात गुंतवणुकीच्या हजारो योजना आहेत. त्या पाहून कोणताही व्यक्ती सहज गोंधळून जाईल. कोठेही गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने ध्यानात घ्यावात , ज्यामुळे तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा भविष्यात वाढेल. तुमचे गुंतवणुकीचे ध्येय साध्य करून तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करेल. ते आपण या लेखात पाहू. 

गुंतवणूक किती असावी ?

जर तुम्ही कमी रक्कम का होईना पण शिस्तीने गुंतवत राहिलात तर दीर्घकाळात तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल. जास्त पैसे आल्यानंतरच गुंतवणूक करावी , किंवा कमी पैशातून जास्त परतावा मिळत नाही , अशी काही व्यक्तींची धारणा असते. (how to invest smartly) मात्र , हे खरे नाही. उदाहरणार्थ , जेव्हा तुम्ही दरमहा  5 हजार रुपये  SIP मध्ये गुंतवत असाल आणि सरासरी व्याजदर 13 टक्के मिळाला तर  25 वर्षानंतर तुमच्याकडे 1 कोटींपर्यंत राशी जमा होईल. जी तुम्हाला निवृत्ती काळासाठी कामाला येईल. जेवढे लवकरात लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल. 

गुंतवणूक न करने किती धोकादायक ठरू शकते ?

गुंतवणूक न करने म्हणजे भविष्यात संकट ओढावून घेण्यासारखे आहे. जर तुम्ही कोणत्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करत नसाल तर हा निर्णय पैसे वाया घालण्यासारखा आहे. भाववाढीमुळे फक्त वस्तुंच्या किंमतीच वाढत नाही तर पैशाचे मूल्यही कमी होते. ( Investment Tips)     उदाहरणार्थ , तुम्ही एक लाख कशातही गुंतवणूक न करता ठेवले तर  25 वर्षांनी त्यांचे मूल्य फक्त  22 हजार एवढे होईल. (महागाईचा दर सरासरी  6 टक्के गृहीत धरून हा अंदाज काढला आहे.) त्यामुळे तुम्ही फक्त अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी ज्यातून तुम्हाला महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळेल. इक्विटी मार्केटमध्ये सरासरी वार्षिक  13% परतावा मिळतो. या पर्यायांतील गुंतवणूक महागाईला मागे टाकेल आणि तुमच्या भविष्याची तरतूद होईल. 

शेअर बाजारातील इंडेक्सचा अभ्यास

शेअर बाजारातील विविध इंडेक्सेसचा परफॉर्मन्स पडताळून पाहा. शॉर्ट टर्म मार्केटमधील चढउतारांकडे दुर्लक्ष करायला शिका. त्यापेक्षा दीर्घकाळात मार्केट कसे असेल यावर लक्ष द्या. इंडेक्स फंडद्वारे देशातील बड्या  50 कंपन्यांना ट्रॅक करणाऱ्या  NIFTY50 इंडेक्समध्ये गुंतवणूक पर्यायाचाही तुम्ही विचार करू शकता. इंडेक्स फंड हे पॅसिव्ह फंड असून ज्याप्रमाणे बाजाराची कामगिरी असेल , त्यानुसार तुम्हाला परतावा मिळेल. कमी पैशात विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला यातून मिळू शकते. फक्त एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा इंडेक्स फंडमधील गुंतवणुकीने तुमची जोखीम कमी होईल. तसेच बाजाराच्या कामगिरीनुसार परतावा मिळेल. 

फंडमधील फक्त परतावा पाहू नका 

म्युच्युअल फंडच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना फक्त परताव्याकडे पाहू नका तर त्या फंडमध्ये जोखीम किती आहे याचाही अभ्यास करा. सहसा , गुंतवणूकदार कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करताना फक्त परताव्याची टक्केवारी पाहून निर्णय घेतात. मात्र , फंड मॅनेज करणारी टीम जोखीम कशाप्रकारे हाताळते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. परताव्यात सातत्य आहे की चढउतार होतात हे पाहा. जो फंड कमी जोखमीत जास्त परतावा देत असेल असे फंड निवडण्याकडे तुमचा कल योग्य राहू शकतो. मात्र , जास्त परतावा आणि जास्त जोखीम तुम्हाला अडचणीत आणू शकते. 

इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करुन कर बचत करा

म्युच्युअल फंडातील इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम  (ELSS) योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कर बचतही करू शकता. बाजारभावानुसार तुम्हाला परतावाही मिळेल. जे करदाते जुन्या कररचनेचा स्वीकार करतील त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. आयकर कायद्यातील  80C नुसार तुम्ही  ELSS फंडातील गुंतवणुकीतून 46 , 800 रुपयापर्यंत करवजावट मिळवू शकता. या योजनांना कमी म्हणजे फक्त  3 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. करबचत योजनांमधील हा सर्वाधिक कमी लॉक इन पिरियड आहे. 

गुंतवणुकीत वैविध्य ठेवा 

जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणुकीत वैविध्य ठेवा. बाजारातील प्रत्येक योजना विविध घटकांवर अवलंबून असते. त्यातील बदलानुसार योजनेतून मिळणारा परतावाही बदलत असतो. फक्त ठराविक कंपन्यांचे शेअर्स , फंड किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे न टाकता उपलब्ध पर्यायांमध्ये पैसे विभागून गुंतवण्यास सुरुवात केली तर जोखीम कमी होईल. काही पैसे सॉवरिन गोल्ड बाँड , डेट फंड , फिक्स्ड इनकम फंडमध्ये गुंतवा. यातून तुम्हाला निश्चित परतावा येत राहील. भांडवली बाजारात चढउतार झाले तरी ही गुंतवणूक सुरक्षित राहील.

रेग्युलर की डायरेक्ट म्युच्युअल फंड निवडावा ?

गुंतवणूक करताना डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्याचे योग्य राहिल. रेग्युलर योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला अतिरिक्त शुल्क अदा करावे लागू शकते. एजंटला तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुमचा एक्सपेन्स रेशोही कमी राहील. फंड मॅनेज करणारी कंपनी तुमचे गुंतवणुकीचे पैसे व्यवस्थापित करण्याच्या बदल्यात काही शुल्क आकारते त्यास एक्सपेन्स रेशो म्हणतात. रेग्युलर प्लॅनमध्ये हा रेशो जास्त असतो. मात्र , तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा रेशो खुप कमी असतो. दीर्घकाळ गुंतवणूक करताना एक दोन टक्क्यांची रक्कमही काही लाखांत जाऊ शकते. त्यामुळे कोणताही फंड निवडताना विविध प्रकारच्या शुल्कांची माहिती घ्या. 

एकंदर विचार करता , गुंतवणूकच न करण्यापेक्षा थोडीफार जोखीम घेऊन गुंतवणूक करने योग्य राहील. यातून तुम्ही दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण कराल. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून पुढील  25 वर्षात भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल. ध्येय निश्चित करुन शिस्तीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात फायदा होईल. कोणत्याही अल्पकालीन पैशांच्या योजनांना बळी पडू नका. भविष्याचा विचार करुन कष्टाने कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवा.