एसआयपी (Systematic Investment Plan) हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र यासाठी तुमच्याकडे भविष्यातलं योग्य नियोजन (Future planning) असायला हवं. ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी असणार आहे. 20, 25, 30 वर्ष अशी दीर्घ गुंतवणूक तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतात, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळेच तुम्ही जेवढ्या लवकर ही गुंतवणूक सुरू करणार, तेवढा अधिक फायदा गुंतवणूकदाराला मिळणार आहे.
Table of contents [Show]
20 टक्क्यांहून अधिक परतावा?
दीर्घकाळासाठी असली तरी यात नियमितपणे पैसा गुंतवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा 1000 रुपयांपासून सुरुवात करता येईल. याच आकारानं छोट्या असलेल्या निधीचं मोठ्या रकमेत रुपांतर करता येईल. ते अगदी सोपं आहे. कारण गेल्या काही वर्षांत काही म्युच्युअल फंडांनी 20 टक्के किंवा त्याहूनही अधिकचा परतावा दिलाय. त्यामुळे 1000 रुपयांचे 2 कोटी 33 लाख करता येणं अशक्य नक्कीच नाही.
दरमहा गुंतवणूक गरजेची
एसआयपीमध्ये तुम्हाला प्रतिमाह 1000 रुपये गुंतवावे लागतील. आपण 20 वर्षांचा कालावधी गृहीत धरू. 20 वर्षांत ही रक्कम 2 लाख 40 हजार होईल. 20 वर्षांमध्ये 15 टक्के वार्षिक परताव्यावर तुमचा फंड 15 लाख 16 हजार रुपये इतका होईल. जर आपण 20 टक्के वार्षिक परताव्यावर चर्चा केली तर हा निधी 31.61 लाख रुपयांपर्यंत जाईल.
30 वर्षांचं गणित काय?
हा 20 वर्षांचा विचार झाला. आता आपण 25 वर्षांसाठीची आकडेवारी कशी होते ते पाहू. दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक आपण करतो आणि वार्षिक 20 टक्के परतावा आपल्याला मिळतो. तर मॅच्युरिटीवर 86.27 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. जर हा कालावधी 30 वर्षांचा असेल, तर 20 टक्के परतावा देऊन तुमचा निधी तया होईल 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपये!
कसा मिळतो लाभ?
म्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांना चक्रवाढ पद्धतीचा लाभ मिळत असतो. यात दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही थोड्या रकमेची गुंतवणूक करूनदेखील मोठा निधी तयार करू शकता. मिळालेल्या परताव्याच्या व्याजामुळे ते जलदगतीनं वाढतात.
गुंतवणूक का गरजेची?
अलिकडच्या एसआयपी करणं गरजेचं आहे. एसआयपीमध्ये तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी नियमित गुंतवणूक करावी लागते. यामुळे सुरुवातीपासून बचतीची सवय लागते. आर्थिक शिस्त लावण्यात एसआयपीचा मोठा वाटा असतो. फायद्यांचा विचार केला तर अनेक फायदे आहेत. एक तर कमी रक्कम गुंतवून अनेक लाभ मिळवता येतात. गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करत असेल तर बाजारभावाच्या एकाच दिवशी पैसे गुंतवले जात नाहीत. त्यामुळे सहाजिकच जोखीम कमी होते. करबचतीमध्ये एसआयपीची मोठी मदत आपल्याला होत असते. ही एक शिस्तबद्ध गुंतवणुकीची पद्धत आहे. बचत दर महिन्याला होत राहते. यातून कधीही पैसे काढण्याची मुभा आपल्याला असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चक्रवाढानं आपली रक्कम वाढत जात असते. त्यामुळे एसआयपीचा सौदा आपल्या फायद्याचाच असतो, असं म्हणायला हरकत नाही.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)