Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Internet in India : शहरांपेक्षा ग्रामीण भागात वाढला इंटरनेटचा वापर, 'इंटरनेट इन इंडिया'चा रिपोर्ट

Internet in India : शहरांपेक्षा ग्रामीण भागात वाढला इंटरनेटचा वापर, 'इंटरनेट इन इंडिया'चा रिपोर्ट

Internet in India : इंटरनेटच्या वापरामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागानं बाजी मारलीय. इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचा वापर खेड्यपाड्यांत सर्वाधिक होत असल्याचं यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलंय. इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022मधून हे समोर आलंय.

सध्या 4G स्पीडनुसार देशभरात इंटरनेट उपलब्ध आहे. तर 5Gची सुरुवात झालीय. मागच्या काही वर्षांपासून इंटरनेटचा वापर सातत्यानं वाढतोय. त्यामुळे यासंबंधीची आकडेवारी जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022मध्ये (Internet in India Report 2022) इंटरनेटच्या भारतातल्या वापरासंबंधीचं विश्लेषण करण्यात आलंय. या रिपोर्टमध्ये भारतातला ग्रामीण भाग इंटरनेटचा वापर अधिक करत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. अर्ध्याहून अधिक भारतीय सक्रिय इंटरनेटचा वापर करणारे झाल्याचं त्यात म्हटलंय.

2025पर्यंत 900 दशलक्षानं वाढ

इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022नुसार, 2025पर्यंत भारतात सर्वाधिक इंटरनेट वाढ अपेक्षित आहे. एकूण लोकसंख्येच्या 52 टक्के भारतीय म्हणजेच सुमारे 76 कोटींहून अधिक लोक सक्रियपणे इंटरनेट यूझर झाले आहेत. सक्रिय म्हणजे साधारणपणे महिन्यातून किमान एकदा तरी इंटरनेटचा वापर करणारा. मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर सातत्यानं सक्रिय इंटरनेट वापरणाऱ्यांचा हा आकडा वाढताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर 2025पर्यंतचा विचार केला तर सरासरी 900 दशलक्ष भारतीय इंटरनेटचा वापर करणारे असतील. 

4 कोटींचा फरक

रिपोर्टमधली आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. हा रिपोर्ट इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियानं (IAMAI) प्रसिद्ध केलाय. सरासरी 76 टक्के एकूण इंटरनेट यूझर्सपैकी 40 कोटी ग्रामीण भागातले असल्याचं स्पष्ट झालंय. कारण शहरातल्या इंटरनेट यूझर्सची संख्या 36 कोटींच्या आसपास आहे. म्हणजेच 4 कोटींहून अधिकचा फरक या दोन्ही विभागांतला दिसून येत आहे. गेल्या वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातल्या शहरी भागात इंटरनेटचा वापर 6 टक्क्यांनी वाढलाय. तर ग्रामीण भागात तो 14 टक्के वाढला आहे.

कोणत्या राज्यात किती यूझर्स?

ग्रामीण आणि शहरी अशा दोन प्रमुख विभागात विभागणी झाल्यानंतर देशातल्या विविध राज्यांत नेमकी काय परिस्थिती आहे, ते पाहणंही महत्त्वाचं आहे. देशातल्या अनेक भागांत चांगलं इंटरनेटचं जाळं आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही नेटवर्कच्या समस्या आहेत. रेंज नसल्यामुळे अनेकांना इंटरनेट वापरताना अडचणी येतात. देशातल्या गोवा या राज्यात सर्वात जास्त इंटरनेटचा वापर केला जातो. इथलं प्रमाण जवळपास 70 टक्क्यांच्या आसपास आहे. तर बिहार या राज्यात इंटरनेटचा सर्वात कमी वापर केला जातो. इथले यूझर्स केवळ 32 टक्के असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय.

मोबाइल डिव्हाइसवर इंटरनेट

एकूण भारतीयांपैकी 54 टक्के इंटरनेट यूझर्स पुरुष आहेत. मात्र सामील होणाऱ्या नवीन यूझर्सपैकी 57 टक्के महिला असल्याचं दिसून आलंय. 2025पर्यंत 65 टक्के नवीन यूझर्स महिलाच असतील, असा निष्कर्षही काढला जातोय. तर 2025पर्यंत 56 टक्के नवे इंटरनेट यूझर्स गावातले असणार आहेत. मोबाइलच्या माध्यमातून सध्या इंटरनेटचा वापर सर्वाधिक आहे. मोबाइलशिवाय टॅब्लेट किंवा स्मार्ट टीव्ही यासारख्या स्ट्रीमिंग डिव्हाइसवरदेखील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या एका वर्षात 8 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत वाढलीय.

डिजीटल पेमेंटची आकडेवारी काय?

कॅशलेस पेमेंट करण्याकडे भारतीयांचा ओढा अधिक दिसून येतो. 2016नंतर यात वाढ झाली. मागच्या एका वर्षाची आकडेवारी पाहू. डिजीटल पेमेंट करणाऱ्यांमध्ये एका वर्षात 13 टक्के वाढ झालीय. हे डिजीटल पेमेंट यूपीआयच्या माध्यमातून झाले आहे. याची टक्केवारी 99 आहे. म्हणजेच ऑनलाइन पेमेंटमध्ये यूपीआय हा सर्वांनाच सोपा पर्याय वाटतो. डिजीटल पेमेंटचा वापर 34 कोटी लोक करत आहेत. त्यापैकी 36 टक्के जनता ग्रामीण भागातली आहे.