लॅपटॉप, स्मार्टफोन्स, सेटटॉप बॉक्स, ब्लूटूथ स्पीकरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करणाऱ्या भारतीय ग्राहकांची संख्या मोठी आहे. अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. परंतु, अनेकदा या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले आहे. याबाबत आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सूचना जारी करत भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना गुणवत्ता चाचणी पूर्ण करावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.
या आदेशाद्वारे सरकारकडून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध व्हाव्यात व भारतीय उत्पादकांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया.
खराब वस्तूंच्या आयातीवर निर्बंध
मंत्रालयानुसार, भारतात आयात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी भारतीय मानक ब्युरोद्वारे (BIS) जारी करणाऱ्या आलेल्या मानकांचे पालन करावे लागेल. यामध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, टॅबलेट्ससह 64 इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. आयात करण्यात आलेल्या वस्तूंची वेळोवेळी चाचणी देखील केली जाईल. मानकांचे पालन केलेले नसल्यास अशा वस्तू पुन्हा परत पाठवल्या जातील अथवा भंगारात समावेश केला जाईल.
भारतात चीनमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त व निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात केली जाते. निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची भारतात आयात होऊ नये यासाठी मंत्रालयाने अनेक वस्तूंचा गुणवत्ता चाचणी यादीत समावेश केला आहे. BIS मानक प्राप्त झाल्यानंतरच या वस्तू बाजारात उपलब्ध होतील.
चीनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मक्तेदारी
भारतीय बाजारात चीनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मक्तेदारी दिसून येते. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतात विक्री झालेल्या प्रत्येकी 10 लॅपटॉप पैकी 8 लॅपटॉप हे चीनमधून निर्यात करण्यात आले. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून उत्पादकांसाठी विविध योजना देखील राबवल्या जात आहेत. असे असले तरीही भारतातील इलेक्ट्रॉनिक बाजारातील चीनची मक्तेदारी वाढताना दिसून येते.
भारतीय ग्राहकांना होईल फायदा
गुणवत्तापूर्ण वस्तू | सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय बाजारात केवळ बीएसआय मानक प्राप्तच इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध होतील. यामुळे भारतीय बाजारात चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध होतील व ग्राहकांना याचा फायदा होईल. |
सुरक्षित व टिकाऊ वस्तू | सुरक्षा मानकांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील. गुणवत्तेमुळे अशा वस्तू दीर्घकाळ टिकतील व ग्राहकांना वारंवार या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. |
देशांतर्गत उत्पादकांना फायदेशीर | खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर घातलेल्या निर्बंधांचा फायदा भारतीय उत्पादकांना देखील होईल. यामुळे देशांतर्गतच चांगल्या वस्तूंच्या उत्पादनांना चालना मिळेल. सरकारकडून देखील अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. भारतातच अशा वस्तूंची निर्मिती झाल्यास या वस्तू कमी किंमतीत उपलब्ध होतील. |