सोशल मीडियापासून ते नेट बँकिंगपर्यंत, प्रत्येकाचा सुरक्षित वापर करण्यासाठी पासवर्ड महत्त्वाचा असतो. मात्र, अनेकांकडून अगदी सोप्या व सहज ओळखता येणाऱ्या पासवर्डचा वापर केला जातो. अशा पासवर्डमुळे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडताना दिसून येतात. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असाल तर अशावेळी स्ट्राँग पासवर्डचा वापर करणे आवश्यक आहे.
स्कॅमर्सकडून होते फसवणूक
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, सायबर हल्ल्यांच्या घटनेत 2024 च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून फिशिंग स्कॅम व रॅन्समवेअर सारख्या पद्धतीचा वापर करून खासगी व आर्थिक माहिती चोरली जात आहे.
स्कॅमर्सकडून खासगी माहिती चोरून याचा वापर बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी केला जातो. सोपा व सहज अंदाज लावता येणाऱ्या पासवर्डचा वापर केल्यामुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड
- 1234
- 1111
- 0000
- 1212
- 7777
- 1004
- 2000
- 4444
- 2222
- 6969
फसवणूक टाळण्यासाठी योग्य पासवर्ड गरजेचा
सोशल मीडिया अकाउंट, ईमेल, नेट बँकिंग, यूपीआय अॅप, डेबिट/क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यांचा सुरक्षित वापर करण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. सहज कोणालाही अंदाज लावता येणारा पासवर्ड असल्यास फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्ट्राँग व हटके पासवर्डचा वापर करून सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. जन्मतारीख, वैयक्तिक माहिती, मोबाइल नंबर, स्वतःचे नाव अशाप्रकारच्या पासवर्डचा हॅकर्सद्वारे सहज अंदाज लावला जातो.
सुरक्षित पासवर्डसाठी या गोष्टी ठेवा लक्षात
- सोशल मीडिया व आर्थिक व्यवहारांसंबधित खात्यांसाठी वेगवेगळा पासवर्डचा वापर करायला हवा. यामुळे तुमची खासगी माहिती चोरी होण्यापासून टाळता येईल.
- ठराविक महिन्यांनी पासवर्ड बदलणे गरजेचे आहे. याशिवाय, नवीन पासवर्ड ठेवताना तो 8 ते 20 शब्दांचा असावा. पासवर्डमध्ये आकडे, अक्षरे व इतर चिन्हांचा समावेश करावा.
- तुम्ही जर नियमितपणे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करत असाल तर अशावेळी टू फॅक्टर ऑथिंटिकेशनचा वापर करू शकता. याशिवाय, ओटीपीचाही वापर करता येईल. यामुळे तुम्ही सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकाल.
- ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना स्वतःच्याच मोबाइल व लॅपटॉपचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. इतरांच्या डिव्हाइसचा वापर केल्यास माहिती सेव्ह करू नये व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर लॉग आउट करावे.
- डायरी अथवा कागदावर पासवर्ड लिहून ठेऊ नये. तसेच, तुमच्या पासवर्डची माहिती कोणालाही देऊ नये. यामुळे तुम्ही आर्थिक फसवणूक टाळू शकता.